Join us

तिसऱ्या लाटेच्या विश्लेषणासाठी येत्या दोन आठवड्यांचा अभ्यास महत्त्वाचा - टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:09 AM

मुंबई : राज्यातील निर्बंध शिथिलता आणि सण-उत्सवांचा काळ असल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर वाढला आहे. परिणामी, राज्यासह शहर उपनगरात ...

मुंबई : राज्यातील निर्बंध शिथिलता आणि सण-उत्सवांचा काळ असल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर वाढला आहे. परिणामी, राज्यासह शहर उपनगरात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मात्र, ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे, असे आताच म्हणता येणार नाही. त्यासाठी पुढील दोन आठवड्यांचा काळ विश्लेषण करण्यासाठी लागेल, असे निरीक्षण कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी मांडले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यात तिसरी लाट ४० दिवसांची असेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील ग्रामीणमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. राज्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात प्रत्येक ठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळते. गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती आहे.

सद्यस्थितीत मास्क न घालता बेशिस्तपणे फिरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषत: ग्रामीणमध्ये नियमांचे पालन होताना दिसत नाही. शहरातील बाजारपेठांमध्येही गर्दी वाढली आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवून लावण्यासाठी सरकारकडून ऑक्सिजन निर्मिती, सावठण क्षमता वाढविली आहे. तसेच रुग्णालयांमध्येही खाटांची व्यवस्था केली असून त्या ठिकाणी बालकांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.

नियम पाळणे गरजेचे

याविषयी, डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, निर्बंध शिथिलतेचा गैरवापर करता कामा नये. नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करायला हवे, दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही अजूनही मास्क न लावणे हे बेफिकिरीचे लक्षण आहे. त्यामुळे संसर्ग वाढीस लागू शकतो. स्वतःसह समाजाच्या आरोग्याचा विचार करून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.