नारायण जाधव, नवी मुंबईकाँगे्रस - शिवसेना नेत्यांचा अनोखा दोस्ताना अन् युतीतील ‘उपऱ्या’ नेत्यांच्या आयारामप्रेमामुळे गेली २० वर्षे शहरात लाठ्या - काठ्या खाऊन भगव्याचे तेज अबाधित ठेवणारे नवी मुंबईतील शिवसैनिक उघड्यावर पडल्याचे चित्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत दिसत आहे. मात्र, आपमतलबी नेते आणि हलक्या कानाच्या श्रेष्ठींमुळे त्यांचे दु:ख ऐकायला कुणी नसल्याने बंडखोरीची तलवार उपसायची की ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ या तत्त्वानुसार पक्षात आलेल्या उपऱ्यांचा प्रचार करायचा, या कात्रीत शिवसैनिक अडकले आहेत. तर ज्यांना तयार राहण्याचे आश्वासन दिले आहे, त्यांची अवस्था एबी फॉर्म देता का एबी फॉर्म अशी झाली असून महिला आघाडी अडगळीत पडली आहे.शिवसेना - भाजपा युतीची चर्चेत शिवसेनेने भाजपापुढे सपशेल नांगी टाकून त्यांना ४० -४५ जागा देऊ केल्या आहेत. मात्र, आता प्रभाग वाटपावरून दोन्ही पक्षांत घमासान सुरू आहे. यात वाशी, सानपाडा, नेरूळ, सारसोळेमधील अनेक हक्काच्या प्रभागावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षात उगवलेल्या उपऱ्या नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी पाणी सोडल्याची चर्चा शिवसैनिकांत आहे.राजकीय निरीक्षकांच्या अंदाजानुसार शिवसेनेच्या एका गटाने विधानसभा निवडणुकीतील परतफेड म्हणून काँगे्रसला १३ जागा सोडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आता युतीच्या जागा वाटपात शिवसेनेने बेलापूर मतदार संघातील सीवूड आणि सानपाड्यासह वाशीतील अनेक जागा व सीवूडचा अख्खा पट्टा भाजपाला आंदण दिलाय. तर उर्वरित जागा काँगे्रस - राष्ट्रवादीतून आलेल्या आयाराम व त्यांच्या कुटुंबांना दिल्याची चर्चा आहे. वाशीत विठ्ठल मोरे इच्छुक असलेली सेक्टर - ९ मधील जागा, याच भागातील एक जागा भाजपात गेलेल्या प्रकाश माटेंसाठी, तुर्भेत काँगे्रसमधून शिवसेनेत गेलेल्या रामा वाघमारेंना दोन जागा, सानपाड्यात भाजपात गेलेले शंकर माटे, पावणेत महादेव मुकादम, ऐरोलीत एम. के. मढवी, नेरूळमध्ये नामदेव भगत यांचे कुटुंबीय आणि कोपरखैरण्यात शिवराम पाटील यांना दोन जागांसाठी शिवसैनिकांच्या भावनेची कदर न करता भाजपाशी तडजोड तर काँगे्रसशी छुपा समझोता केल्याची चर्चा आहे. भाजपाच्या विकास सोरटे, सुनील होनराव यांनाही जागा सोडल्यात. तुर्भे गावठणात भाजपाचे रामचंद्र घरत यांच्याबाबत शिवसैनिकांत संताप असून सेनेकडून चालढकल होत आहे.
उप-यांच्या दोस्तान्यात शिवसैनिक वा-यावर...
By admin | Published: April 06, 2015 5:00 AM