मुंबई : अहमदाबाद येथे एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला वॉरंट बजाविण्यासाठी निघालेल्या नागपाडा एटीएसच्या उपनिरीक्षकाचा एक्स्प्रेसमध्येच प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नरेंद्र उर्फ भाई पाटकर असे त्यांचे नाव आहे.नागपाडा एटीएस युनिटमध्ये पाटकर हे उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले. ते धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्याच जवळ होते. अशात सोमवारी काम उरकून ते अहमदाबादमधील एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला वॉरंट बजाविण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता कार्यालयातून निघाले.रात्रीच्या अहमदाबाद एक्स्प्रेसमधून ते प्रवास करीत होते. गाडी अहमदाबाद स्थानकात थांबताच, तेथील रेल्वे पोलिसांना पाटकर झोपलेले दिसून आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला.
वॉरंट बजाविण्यासाठी निघालेल्या उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:50 AM