मुंबई : ठाणेकर तेजस शिरोसे याने आपली विजयी घोडदौड कायम राखताना पुण्याच्या अथर्व अरासचे आव्हान २-१ असे परतावून दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत कूच केली. मुलांच्या १५ वर्षांखालील गटात झालेल्या या अटीतटीच्या लढतीत तेजसने झुंजार खेळ करताना पिछाडीवरुन अथर्वला धक्का दिला. त्याचवेळी दर्शन पुजारी, आदित्य राहकर या पुणेकरांनीही विजयी आगेकूच केली.नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील स्पोटर््स अॅकेडमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुणेकर अथर्वने आक्रमक सुरुवात करताना १५-१४ अशी अवघ्या एका गुणाने बाजी मारत पहिला गेम जिंकला. मात्र यानंतर ठाणेकर तेजसने जबरदस्त पुनरागमन करताना वेगवान खेळ करताना अथर्ववर दडपण टाकले. तेजसच्या धडाक्यापुढे अथर्वकडून मोक्याच्यावेळी चुका झाला आणि तेजसने सलग दोन गेम जिंकताना १४-१५, १५-९, १५-१४ अशी बाजी मारुन सामना जिंकला.दुसरीकडे दर्शन पुजारीनेदेखील तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात नाशिकच्या एस. शानबागचे कडवे आव्हान १५-१४, १३-१५, १५-१३ असे परतावले. तर आदित्य राहकरने सहज विजय मिळवताना वरुण नागदेवला सरळ दोन गेममध्ये १५-१४, १५-७ असे पराभूत केले. अन्य लढतीत औरंगाबादच्या क्षणयने आक्रमक खेळाच्या जोरावर ठाण्याच्या रचित अगरवालचे आव्हान १५-७, १५-१३ असे संपुष्टात आणले. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या अनय चौधरीने कोल्हापूरच्या हर्षवर्धन इतकारकरला १५-१४, १५-१० असे नमवले. तर मुंबई उपनगरच्या ध्रुव ओझाला पुण्याच्या सस्मित पाटीलविरुद्ध ११-१५, १५-१३, ८-१५ असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे उपनगरच्या विनायक भाटीयाने शैलेश मारेचा १५-१२, १५-१४ असा पराभव करुन आगेकूच केली. तर उपनगरच्याच डी. परडिवाला यानेही विजयी कूच करताना नागपूरच्या शशांक कुलालला १५-१२, १५-९ असा पराभवाचा धक्का दिला.
सब - ज्युमिअर बॅडमिंटन : ठाणेकर तेजसची विजयी घोडदौड
By admin | Published: July 10, 2016 10:58 PM