मुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती मार्गावरील सब-वेला तडा, मालाडमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 06:40 AM2017-11-02T06:40:40+5:302017-11-02T06:40:47+5:30
मालाड पूर्वेकडील शांताराम तलाव येथील मुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सब-वेला मोठा तडा गेला आहे. त्यामुळे हा पूल कोसळण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच संबंधित यंत्रणेने या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आता मालाडमध्ये जोर धरत आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : मालाड पूर्वेकडील शांताराम तलाव येथील मुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सब-वेला मोठा तडा गेला आहे. त्यामुळे हा पूल कोसळण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच संबंधित यंत्रणेने या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आता मालाडमध्ये जोर धरत आहे.
मुंबई-अहमदाबाद द्रुतगती मार्गावरील कुरारगाव येथील शांताराम तलावाजवळील हा सब-वे कित्येक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. या पुलाची कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दिवसभरात लाखो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या पुलावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. हा पूल अजून किती दिवस तग धरून राहील, याची शाश्वती नसल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची दुरुस्ती तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. त्यात आता ‘सब-वे’ पुलाच्या सिमेंट ब्लॉकचा बराचसा भाग जीर्ण होऊन कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या समस्येची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा मोठ्या दुर्घटना होण्याची भीती स्थानकांनी वर्तविली आहे.
या ‘सब-वे’तून स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थी ये-जा करत असतात. आप्पापाडा ते पुष्पापार्क या परिसरातील नागरिकांचा तर हा रोजचा मार्ग आहे. सकाळी आणि सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीदेखील होते. ‘सब-वे’च्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झालेली आहे. पावसाळ््यात या ‘सब-वे’त मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ‘सब-वे’च्या शेजारी गटार असून, ते नेहमीच तुंबलेले असते. लोकप्रतिनिधींकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात, परंतु नागरिक तात्पुरत्या उपाययोजनांना आता वैतागले आहेत. ‘सब-वे’च्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रुंदीकरणासाठी लागणारा निधी मिळाला की, लगेच कामाला सुरुवात केली जाईल, तसेच नुकतीच ‘सब-वे’ची पाहणी केली. या ‘सब-वे’च्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली जाईल, असे स्थानिक नगरसेविका दक्षा पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते.
‘सब-वे’ बारा महिने खड्डे आणि धुळीने भरलेला असतो. पुष्पा पार्क रिक्षा स्टँड ते समुद्रा हॉटेलपर्यंतच्या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. मागील काही महिन्यांपूर्वी कुरारमधील राइट रिक्षा स्टँड, रमेश रिक्षा स्टँड, ओंकार रिक्षा स्टँड आणि आप्पापाडा रिक्षा स्टँड या रिक्षावाल्यांंनी स्वत: खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते, अशी माहिती स्थानिक रिक्षाचालकांनी दिली.
प्रशासनाला माहिती देऊ
‘सब-वे’ची नुकतीच पाहणी केली गेली. ‘सब-वे’च्या समस्येबाबत संबंधित प्रशासनाला माहिती दिली जाईल.
- विनोद मिश्रा, स्थानिक नगरसेवक
रस्ता बनला धोकादायक
या ‘सब-वे’त मोठी वाहतूककोंडी होते. पावसाळ्यात प्रचंड पाणी साचते. त्यामुळे आम्हाला रिक्षा चालविणे अत्यंत कष्टदायक ठरते. कुरार गावात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. परिसरात सर्रास अनधिकृत पार्किंगही केली जाते, तसेच या सब-वेचा थोडा भागही कोसळला आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.
- सुरेश कट्टे, रिक्षाचालक
अवजड वाहनांना हवी ‘नो-एंट्री’
जास्त उंचीची अवजड वाहने मालाड ‘सब-वे’तून जाताना, त्यामुळे सब-वेच्या छताला हानी पोहोचते. त्यामुळे अवजड वाहनांना या सब-वेत ‘नो एंट्री’ करावी. काही वेळी येथे तात्पुरती डागडुजी झालेली आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटचा पाइप टाकला आहे, परंतु तो मुख्य नाल्याला जोडलेला नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाचा वापर करणे भाग पडते.
- अहमद शेख, रिक्षाचालक
पूल हळूहळू कमकुवत होतोय
शांताराम तलाव येथील ‘सब-वे’ पुलाची दुर्दशा होत आहे. कित्येक महिन्यांपासून हा पूल हळूहळू कमकुवत बनत चालला आहे. सध्या मेट्रोच्या कामाचे हादरे या पुलाला बसत आहेत. त्यामुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- प्रमोद जाधव, संस्थापक,
विचारधारा साईराम फाउंडेशन
वाहतूककोंडी कायमची सोडवा
मालाड ‘सब-वे’मध्ये वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. या ‘सब-वे’च्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांसह रिक्षाचालकांना त्रासही सहन करावा लागतो. - दिलीप शुक्ला, प्रवासी