मुंबई- शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. यादरम्यान माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यातून मी वाचलो आहे. लोकशाहीत जर कुणी उठाव केला तर त्याच्यावर हल्ला करणं दुर्दैवी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
विचाराचा प्रतिकार विचारानेच व्हावा. ज्यांनी हल्ला केला ते जेलमध्ये जातील. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे कोण उभं राहणार आहे? आता ती कुटुंब वाऱ्यावर पडली. आम्ही सेना स्टाईलने उत्तर देऊ. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. मी संयम पाळतोय. कर्माची फळे भोगावी लागणार आहे, असं इशारा देखील उदय सामंत यांनी यावेळी दिला.
मी शांत आहे कारण माझ्यावर संस्कार आहे. राजकारण आरोग्यदायी असले पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले. परंतु हे राजकारण समोरच्याचं आरोग्य बिघडवण्यासाठी आहे, असा आरोप उदय सामंत यांनी केला होता. मात्र या घटनेवर शिवसेनेनं केलेल्या एका विधानामुळे विविध तर्कवितर्क लढविले जात आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ला, ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचं विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई याांनी केलं आहे.सुभाष देसाईंच्या या विधानामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पाच जणांवर गुन्हा दाखल-
शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर ३५३,१२०,३०७,३३२ कलमान्वे गुन्हा दाखल केला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कात्रज परिसरात येणार होते. त्यामुळे या परिसरात अगोदर पासून तणाव होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. आदित्य ठाकरे हे सभेनंतर थेट मुंबईला जाणार होते. ठाकरे यांनी अचानक शंकर महाराज मठाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी स्वारगेटकडील रस्ता पोलिसांनी क्लिअर केला. तोपर्यंत ठाकरे यांचा कॉन्व्हाय कात्रज चौकात थांबला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉन्व्हाय गंगाधाम मार्गे शंकर महाराज मठाकडे अगोदर गेली. मात्र उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली. त्यावेळी सभा संपल्यानंतर संपूर्ण चौकात शिवसैनिकांनी भरला होता. उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पहाताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली.