मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांनी बंड केले.यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्के देण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते मुख्यनेत्यांपैकीही एक नेते आहेत. सुभाष देसाई हे सध्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.