सुभाष घईंचा 'कर्मा' पुर्नप्रदर्शित; संगीतप्रधान ब्लॉकबस्टर सिनेमा ३८ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर
By संजय घावरे | Published: February 3, 2024 07:04 PM2024-02-03T19:04:22+5:302024-02-03T19:04:39+5:30
मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणाऱ्या या चित्रपटाचा आनंद आजच्या पिढीला मोठ्या पडद्यावर लुटता यावा
मुंबई - हिंदी सिनेसृष्टीत शोमॅन अशी ओळख असणारे निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी आजवर बरेच एव्हरग्रीन सिनेमे रसिकांना दिले आहेत. यापैकीच एक असलेला मल्टिस्टारर 'कर्मा' हा टाईमलेस क्लासिक चित्रपट या आठवड्यात पुर्नप्रदर्शित करण्यात आला आहे. देशभरातील निवडक पिव्हीआर-आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या आठवड्यात कोणताही मोठा हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला नाही. अशा वेळी प्रेक्षकांना पुन्हा जुन्या चित्रपटाचा आनंद लुटता यावा यासाठी पिव्हीआर आयनॉक्सने 'कर्मा' रिलीज केला आहे. दिलीप कुमार, नूतन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, नसीरुद्दीन शाह, श्रीदेवी, पूनम ढिल्लन, सत्यनारायण कैकला, अनुपम खेर, दारा सिंग अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'कर्मा' १९८६मध्ये रिलीज झाला होता. पटकथा, संवाद, अभिनय, गीत-संगीत अशा विविध बाबतीत स्मरणीय ठरलेला हा चित्रपट त्या काळी खूप गाजला. मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणाऱ्या या चित्रपटाचा आनंद आजच्या पिढीला मोठ्या पडद्यावर लुटता यावा आणि ॲक्शन-पॅक थ्रिलरची जादू पुन्हा अनुभवता यावी यासाठी 'कर्मा' पुर्नप्रदर्शित करण्यात आला आहे. 'कर्मा' मोठ्या पडद्यावर पुर्नप्रदर्शित केल्याबद्दल पिव्हीआर आयनॉक्सचे आभार मानत सुभाष घई म्हणाले की, या निमित्ताने नवीन पिढीला 'कर्मा'शी कनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. लार्जर दॅन लाईफ सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी तरुणाईला आमंत्रित करायला मला निश्चितच आवडेल. यातील 'ऐ वतन तेरे लिए...' हे गाणे हृदयाला भिडणारे आहे. एकूणच मोठ्या पडद्यावर 'कर्मा'सारख्या चित्रपटांचा आनंद घेणे हा एक वेगळा अनुभव असतो.
अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या 'कर्मा'मधील 'ऐ वतन तेरे लिए...' या गाण्याखेरीज 'मेरा कर्मा तू...', 'ऐ सनम तेरे लिए...', 'मैंने रब से तुझे...', 'दे दारू...', 'ना जैयो परदेस...', 'ऐ मोहब्बत तेरी दास्तां...' ही सर्वच गाणी सुपरहिट ठरली होती. सचिन भौमिक आणि कादर खान यांच्या साथीने घईंनीच या चित्रपटाचे लेखन करत निर्मितीची जबाबदारीही सांभाळली होती.