वाहन कर्ज घोटाळा : असोसिएशनच्या अध्यक्षपदी असताना निधीही लाटल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात ख्याती असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या डबेवाला असोसिएशनचा माजी अध्यक्ष सुभाष तळेकरला अखेर मंगळवारी घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातून ही कारवाई करण्यात आली आहे.
डबेवाल्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना मोफत दुचाकी देण्याचे आश्वासन देत तळेकरने २०१५मध्ये वेगवेगळ्या कागपत्रांवर सह्या घेतल्या. अशात, तळेकर व त्याच्या साथीदारांनी या सह्यांच्या वापर करून भैरवनाथ पतसंस्थेकडून डबेवाल्यांच्या नावाने वाहन कर्ज घेऊन एकरकमी धनादेश डिलरकडे सुपूर्द केला. पण प्रत्यक्षात त्याने फक्त १५ डबेवाल्यांना मोपेड गाड्या दिल्या, तर २३ डबेवाल्यांना गाड्यांची नोंदणी न करता गाड्या दिल्या व उर्वरित डबेवाल्यांना गाड्याच दिल्या नाहीत. परंतु त्यांच्या नावे कर्ज लाटले. वाहन न मिळाल्याने सुरुवातीला डबेवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशात २०१९मध्ये कर्जाची परतफेड न केल्यामुळे मालमत्ता जप्तीच्या नोटीस डबेवाल्यांना बजावण्यात आल्या. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी घाटकोपर पोलिसांनी सचिन गावडे यांच्या तक्रारीवरून तळेकरसह विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, भावेश दोषी, साई इंटरप्राईजेसचे राकेश प्रसाद यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला. याप्रकरणी मंगळवारी तळेकरला त्याच्या मूळ गावी पुण्यातील खेडे तालुक्यातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेच्या वृत्ताला घाटकोपर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
....
सहानुभूतीचा केला वापर
सुभाष तळेकरने वेगवेळ्या क्षेत्रात डबेवाल्यांच्या सहानुभूतीचा वापर करून लाखोंचा निधी बळकावला. डबेवाल्यांच्या नावाने फक्त कौटुंबीक व्यक्तिंना सोबत घेऊन बोगस संस्था स्थापन केली. कोरोना काळात डबेवाल्यांना करण्यात येणाऱ्या वस्तुरूपी व आर्थिक मदतीचा घोटाळा केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डबेवाला संघटनेकडून होत आहे.
....