पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:38 PM2023-12-31T18:38:12+5:302023-12-31T18:39:37+5:30
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आरोप केला की, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल
मुंबई - राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने होत आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना महाविकास आघाडीकडून वेदांता फॉक्सकॉनपासून ते विविध प्रकल्पावरुन निशाणा साधला जात आहे. त्यातच आता राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला होता. सिंधुदुर्गातील हा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल, असे नाईक यांनी म्हटले होते. त्यावर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी, त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचाही संदर्भ दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आरोप केला की, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल. २०१८ मध्ये पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्र विभागाच्या पर्यटन खात्याने सिंधुदुर्गात आणला होता. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाला निधीची तरतूद केली होती. मात्र, आता या प्रकारचे चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा गुजरात शासन आणि केंद्र सरकारचा डाव आहे. हा डाव समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर, आता मुख्यमंत्र्यांनी तो प्रकल्प महाराष्ट्रात राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पाणबुडी प्रकल्प आपल्याच राज्याचा आहे, तो राज्याबाहेर जाणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी माझी चर्चा झाली असून दीपक केसरकर इथं माझ्यासोबतच आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणबुडी प्रकल्प गुजरात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, विरोधकांच्या काळात कामे ठप्प होती, त्यामुळे त्यांना आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
MTHL बद्दलही बोलले मुख्यमंत्री
MTHL म्हणजेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक हा देशातील सर्वात लांब समुद्र पुल आहे. मुंबईहून रायगडला जाण्यासाठी आज २ तास लागतात, पण हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर केवळ १५ ते २० मिनिटांत रायगडला पोहोचता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच, हा गेमचेंजर प्रकल्प असून वेळेची बचत, इंधनाची बचत आणि पर्यावरणासाठी पूरक असल्याचंही त्यांनी म्हटलं. समृद्धी महामार्ग, एमटीएचएचल, मेट्रो किंवा तत्सम प्रकल्प थांबवण्यात आले होते. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ गती दिली, त्यामुळे ही कामे जोमाने सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान, मुंबईजवळील रेव्ह पार्टीसंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. रेव्ह पार्टीत ड्रग्ज सापडलं असून त्याबाबत गुन्हाही दाखल केला आहे. पोलीस आयुक्तांसोबत माझं फोनवरुन बोलणं झालं आहे. मुंबईत पोलिसांनी ५००० कोटींचं ड्रग्ज पकडलं आहे. आम्ही ड्रग्जमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने कारवाई करण्यात येत असून ड्रग्जच्या ठिकाणी छापे टाकून ने नष्ट करण्याचंही आम्ही पोलिसांनी सांगितल्याचं ते म्हणाले.