डोंबिवली : रासायनिक कंपनीत गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटाकरिता एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा विभागाची हलगर्जी कारणीभूत असल्याने कंपनीमालकाबरोबर संबंधित विभागांच्या दोषी अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.विखे-पाटील यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. या स्फोटाच्या चौकशीचा सरकारने केवळ फार्स करू नये. स्फोटाची तीव्रता आणि व्याप्ती पाहता या प्रकरणाची चौकशी नॅशनल केमिकल लॅबसारख्या केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. डोंबिवलीतील रु ग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमींची त्यांनी विचारपूस केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची, तर जखमींना २ लाखांची मदत करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.या वेळी आ. संजय दत्त, ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश टावरे, कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश पदाधिकारी तारिक फारुखी, संतोष केणे, महानगरपालिकेचे गटनेते नंदू म्हात्रे, शारदा पाटील, कल्याण लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिज दत्त, विजय मिश्रा आदी पदाधिकारी हजर होते. (प्रतिनिधी)भाजपा नेत्या शायना एन.सी. यांचीही भेटभाजपा नेत्या शायना एन.सी. यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेतील बाधितांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळेंसह अन्य नगरसेवक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
By admin | Published: May 29, 2016 12:39 AM