सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी आरोपमुक्त अधिका-यांची यादी सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:26 AM2018-01-30T04:26:26+5:302018-01-30T04:26:42+5:30
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी आरोपमुक्तता केलेल्या पोलीस अधिका-यांची नावे व त्यांची या गुन्ह्यात असलेली भूमिका, याची यादी सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.
मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी आरोपमुक्तता केलेल्या पोलीस अधिका-यांची नावे व त्यांची या गुन्ह्यात असलेली भूमिका, याची यादी सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने केलेल्या अपिलावर व सीबीआयने काही पोलिसांच्या आरोपमुक्ततेला दिलेले आव्हान, अशा दोन्ही याचिकांवर दररोज सुनावणी घेऊ, असे न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी म्हटले. या दोन्ही याचिकांवर ९ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा, राजकुमार पांडीयन आणि दिनेश एम. एन. यांना विशेष सीबीआय न्यायालयाने बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त केले. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला रुबाबुद्दीनच्या भावाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, तर सीबीआयनेही एन. के. आमीन व पोलीस हवालदार दलपत सिंह राठोड यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
विशेष न्यायालयाने या प्रकरणातील ३८ आरोपींपैकी १५ जणांची आरोपमुक्तता केली आहे. त्यामध्ये आमीन आणि राठोडचाही समावेश आहे.