Join us

दुधाच्या पिशव्यांबाबत आराखडा सादर करा- रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:53 AM

राज्यातील दूध संघांनी दूध पिशव्यांचे संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुन:प्रक्रिया (रिसायकलिंग) कशी करणार याचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करावा.

मुंबई : राज्यातील दूध संघांनी दूध पिशव्यांचे संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुन:प्रक्रिया (रिसायकलिंग) कशी करणार याचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करावा. अन्यथा, प्लॅस्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिला.मंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्लॅस्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची आज मंत्रालयात बैठक झाली. या वेळी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पिशवीबंद दूध विक्रेत्या संघांना यापूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे ग्राहकांकडून संकलन, बायबॅक व रिसायकलिंग करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत दूध संघांनी आवश्यक व्यवस्था उभारली नाही. १५ दिवसांत दूध संघांनी या व्यवस्था उभ्या कराव्यात; अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कदम म्हणाले.प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी लवकरच विभागस्तरीय बैठका घेण्यात येतील. प्लॅस्टिक पाऊचमध्ये पाणी विकणाऱ्या कंपन्यांच्या मागणीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य शासनास भूमिका मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार या प्रकरणात कोणताही दिलासा देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका उच्चाधिकार समितीने घेतली आहे. त्यानुसार प्लॅस्टिक पाऊचमध्ये पाणी विकण्यास बंदी असल्याचा पुनरुच्चार करत ही भूमिका उच्च न्यायालयात मांडण्याचे या बैठकीत ठरले.

टॅग्स :रामदास कदम