घाटकोपरमधील अत्याचार प्रकरणी अहवाल सादर करा, महिला आयोगाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 02:51 AM2020-08-22T02:51:45+5:302020-08-22T02:52:48+5:30
याबाबत तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिले आहेत.
मुंबई : गर्भवती महिलेसह तिच्या ११ वर्षीय मुलीवर दोघा पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. हे प्रकरण संवेदनशील आणि गंभीर असून याबाबत तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिले आहेत.
घाटकोपर येथील गर्भवती महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन पोलीस शिपायांनी रिक्षाचालकासह अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. हेल्पकेअर संस्थेच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी शिपायांसह रिक्षाचालकाविरुद्ध बलात्कार, पॉक्सोअंतर्गत रविवारी गुन्हा नोंदविला होता. ‘लोकमत’ने गुरुवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची स्वाधिकारात दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार २८ वर्षीय महिलेच्या वतीने हेल्पकेअर फाउंडेशनने पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार आरोपी पोलिसांनी १२ जानेवारी २०२० रोजी सदर महिलेस धमकाविले. त्यानंतर १५ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास दोघे पोलीस शिपाई आणि रिक्षाचालक तिच्या घरी आले. त्या वेळी अडीच महिन्यांची गर्भवती असलेली तक्रारदार महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यात मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. सध्या दोन्हीही शिपाई घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.