मुंबई : सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांत एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी अँटिरेट्रोव्हायरल थेरेपी (एआरटी) ड्रग्स उपलब्ध करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एका एनजीओला दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवस राज्यासह देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली व सातारा येथील एचआयव्हीबाधित रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांत उपचार घेणे शक्य नाही, अशी माहिती येथील एनजीओ ‘वेश्या एड्स मुकाबला परिषद’ने उच्च न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.राज्यांतर्गत वाहतूकही बंद करण्यात आल्याने सातारा, सांगली येथील रुग्णांसाठी एटीआर उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.एचआयव्हीबाधित रुग्णांना एआरटी मिळणे आवश्यक आहे. दर महिन्याला हे रुग्ण त्यांचा डोस घेण्यासाठी मुंबईला जातात. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना या महिन्यात मुंबईत डोस घ्यायला जाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात एटीआरची व्यवस्था करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी एनजीओने केली आहे.त्यावर न्यायालयाने वरील आदेश देत ही सुनावणी तहकूब केली़
एड्स उपचारांसाठी निवेदन सादर करा, उच्च न्यायालयाचे एनजीओला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:39 AM