... त्यांची पुढील ४८ तासांत बदली करुन दाखवा; जयंत पाटलांचं गृहमंत्र्यांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 08:58 PM2023-04-04T20:58:15+5:302023-04-04T20:59:55+5:30
गृहमंत्र्यांनी पुढील ४८ तासांत ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून दाखवावी, असं आव्हान जयंत पाटलांनी फडणवीसांना दिलंय.
मुंबई - ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची तक्रार अद्याप नोंदवून घेतली नसल्यानं ठाकरे गटाकडून ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. तर, आदित्य ठाकरेंनीही ट्विट करुन शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. आता, महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय.
गृहमंत्र्यांनी पुढील ४८ तासांत ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून दाखवावी, असं आव्हान जयंत पाटलांनी फडणवीसांना दिलंय. दरम्यान, उद्धव ठाकरे हे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते. पण, ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नसल्यानं उद्धव ठाकरे यांची भेट होऊच शकली नाही. त्यामुळे ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय. तर, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनीही फडणवीसांना लक्ष्य केलंय.
''देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर त्यांच्या अधिकारांतर्गत येत नाही. सध्या ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघितली, तर माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, त्यांनी आज, उद्यापर्यंत किंवा पुढील ४८ तासांत ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे शहाराच्या बाहेर महाराष्ट्रात बदली करावी. तरंच, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये दम आहे, असं आम्ही समजू. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेऊ…'', असे जयंत पाटील यांनी म्हटलंय.