‘डीजीपी’चा सस्पेन्स कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीने राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकाची अद्याप निश्चिती केलेली नसली, तरी विद्यमान प्रमुख सुबोध जायसवाल सोमवारी पदभार सोडणार असल्याचे समजते. बुधवारी त्यांची औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाली आहे, पण महासंचालकपदाच्या नियुक्तीबाबतचा सस्पेन्स सरकारने फार काळ लांबवू नये, अशी अपेक्षा पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे.
पोलीस महासंचालक पदासाठी होमगार्डचे महासमादेशक संजय पांडये व एफएसएलचे हेमंत नागराळे यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, जोपर्यंत निश्चिती केली जात नाही, तोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपविला जाणार असल्याचे समजते.
नूतन प्रमुखाच्या नियुक्तीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीची निश्चिती आवश्यक असते. मात्र, राज्य सरकारने अद्याप त्याबाबत प्रस्ताव पाठविलेला नाही. त्यामुळे तूर्तास तात्पुरता स्वरूपात या पदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार द्यावा लागणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीशी जायसवाल यांचे फारसे सख्य नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून त्याच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांपूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला होता. राज्य सरकारने त्याला संमती दिल्याने बुधवारी केंद्राकडून सीआयएसएफच्या प्रमुख पदी नियुक्तीचे करण्यात आली. मात्र, त्यांच्या पदावर दुसऱ्याची नियुक्ती न झाल्याने त्यांनी पदभार सोडलेला नाही. सोमवारपर्यंत त्याबाबत निर्णय न झाल्यास ते पदभार सोडण्याची शक्यता सूत्राकडून वर्तविण्यात आली.