Join us

सुबोध जायसवाल यांच्या प्रतिनियुक्तीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:29 AM

केंद्राकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव; उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर लक्ष

- जमीर काझी मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदांची महिना अखेरीस धुरा कोणाच्या गळयात पडणार, याबाबत पोलीस वर्तुळात उत्सुकता लागून राहिली असताना पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल प्रतिनियुक्तीवर दिल्लीला जाणार का, याबाबतही तर्कवितर्क करण्यात येत आहेत. केंद्राने त्यांच्या प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला असून मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे.मुख्यमंत्र्यांना येत्या चार-पाच दिवसांत त्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यावरच जायसवाल हे महाराष्टÑात राहणार की दिल्लीत जाणार, याबाबत निश्चिती होणार असल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची मुदत महिन्याअखेरीस संपत आहे, त्यांचे वारसदार म्हणून जायसवाल यांच्या नावाची चर्चा केंद्रात तसेच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांत आहे. सुरुवातीला त्यासाठी ते उत्सुक होते. सध्या मात्र ते इच्छुक नाहीत, असे समजते.दिल्ली पोलीस दल केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून तेथील आयुक्त पटनायक हे ३१ जानेवारीला निवृत्त होणार होते. मात्र तेथे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर आले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारमध्ये पुन्हा तणावाचे संबंध राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती केली जाते, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.दरम्यान केंद्र सरकारकडूनही नवीन आयुक्त निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आयपीएसच्या १९८५च्या तुकडीतील ज्येष्ठ अधिकारी आणि महाराष्टÑाचे महासंचालक सुबोध जायसवाल यांचे नाव आघाडीवर आहे. महाराष्टÑ केडरचे असले तरी त्यांनी अनेक वर्षे केंद्रात प्रतिनियुक्तीवर काम पाहिले आहे. त्यानंतर आठ महिने मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची गेल्या वर्षी २८ फेबु्रवारीला राज्याचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडून राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. गृहविभागाकडून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे.जायसवाल यांची रॉ, आयबीला पसंतीसुबोध जायसवाल यांची बहुतांश सेवा प्रतिनियुक्तीवर झाली आहे. मुंबईला आयुक्त म्हणून ‘घरवापसी’ होईपर्यंत ते १५ वर्षांहून अधिक काळ केंद्रात कार्यरत होते. त्यांच्या निवृत्तीला जवळपास पावणेतीन वर्षे (सप्टेंबर २०२२) शिल्लक आहे. त्यामुळे आयबी, रॉ या गुप्तचर यंत्रणेत संचालक म्हणून प्रतिनियुक्तीसाठी ते इच्छुक असल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या ही जागा रिक्त नसल्याने त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.अशी आहे प्रतिनियुक्तीची प्रक्रियाएखाद्या अधिकाऱ्यांची केंद्रात प्रतिनियुक्ती ही दोन प्रकारे केली जात असते. संबंधित अधिकारी केंद्रात जाण्यास इच्छुक असल्यास राज्य सरकारच्या संमतीने त्यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जातो. तर केंद्र सरकारही एखाद्या अधिकाºयाला संबंधित राज्य सरकारकडे मागणी करून बोलावून घेऊ शकतात, मात्र त्यासाठी केंद्र सरकारची त्याच्यावर मर्जी असावी लागते.