लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांना शेती करतेवेळी होणाऱ्या अपघातांपासून संरक्षण दिले जाणार आहे. याआधी असलेल्या विमासंरक्षणाऐवजी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, ‘गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान’ योजना राज्यभरात लागू करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ही योजना कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी लागू राहणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली. मात्र, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे दावे वेळेत मंजूर न होणे, विमा प्रकरणे त्रुटी काढून नाकारणे असे प्रकार विमा कंपन्यांकडून केले जात होते. याविषयी सरकारकडून समज दिल्यानंतरही विमा कंपन्यांमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे विम्याऐवजी थेट सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे.
किती मिळेल अनुदान?अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, दोन डोळे, दोन हात किंवा पाय निकामी झाल्यास दोन लाख तर एक अवयव निकामी झाल्यास एक लाख अनुदान दिले जाणार आहे. मृत व्यक्तीचे आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल.
या अपघातांचा समावेश रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशकांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांच्या चावण्याने जखमी/ मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य अपघात, या अपघातांचा समावेश असेल. आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या वा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे याचा समावेश नाही.
अर्जासोबत कागदपत्रे७/१२ उतारा, मृत्यू दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव नमुना नं. ६- क नुसार मंजूर वारसाची नोंद, वयाचा पुरावा, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल.