सुशोभीकरणासाठी  वापरले दर्जाहीन साहित्य; माजी नगरसेवकांची पालिकेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:08 PM2023-08-18T13:08:45+5:302023-08-18T13:09:35+5:30

या कामाची चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे.

substandard materials used for beautification former corporators criticize the municipality | सुशोभीकरणासाठी  वापरले दर्जाहीन साहित्य; माजी नगरसेवकांची पालिकेवर टीका

सुशोभीकरणासाठी  वापरले दर्जाहीन साहित्य; माजी नगरसेवकांची पालिकेवर टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला. ही कामे उरकण्याचा सपाटा प्रशासनाने लावला असून घाईगडबडीत कामे उरकल्याने सुशोभीकरणाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य दर्जाहीन असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला असून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे.

मुंबईचे रूपडे पालटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सौंदर्यीकरण प्रकल्प हाती घेण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानुसार प्रशासनाने विविध प्रभागांना सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यासाठी प्रत्येकी ३० कोटी दिले. या निधीतून पालिकेने कंत्राटदार नेमून रंगरंगोटी, रोषणाई, काँक्रिट रस्ते बांधणी, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण आदी कामे पालिकेने हाती घेतली, मात्र पहिल्याच पावसात या कामांची रया गेली. रंगरंगोटी करण्यात आलेल्या भिंतींचा रंग उतरला असून काही ठिकाणी शेवाळ आले आहे. इतकेच काय तर रस्त्याच्या दुतर्फा विजेच्या खांबांवर लावलेले मोर, नमस्कार करणारे हात यांची दुर्दशा झाली आहे.

सुशोभीकरणासारख्या कामांवर माजी नगरसेवक का आक्षेप घेत नाहीत? पालिका अधिकाऱ्यांचीही यात मोठी चूक असून अशा कामांचे त्यांनी पर्यवेक्षण करायला हवे. सुशोभीकरण कामासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरले गेले असून ५ ते ६ महिन्यांतच या सुशोभीकरणाच्या कामाची दुरवस्था मुंबईत पाहायला मिळत आहे. - गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन.

मुंबई महापालिका सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी खर्च करतेय, मात्र त्याचा काहीच उपयोग नाही. सुशोभीकरण कामाचा कोणत्याही प्रकारचा दर्जा राखला जात नाही. अनेक ठिकाणी या कामाचे बारा वाजले असून नगरसेवक नसल्याने कामे पटापट मंजूर केली जात आहेत. त्यामुळे या कामांची चौकशी झालीच पाहिजे. - रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस.

सुशोभीकरण हे वेस्ट ऑफ मनी आहे. यातून काहीच आउटपुट निघत नाही. नागरिकांचा पैसा पालिका वारेमाप खर्च करतेय. कुठे तरी हे थांबायला हवे. - संदीप देशपांडे,  माजी नगरसेवक, मनसे.

पालिका कोट्यवधी खर्च सुशोभीकरणाच्या कामासाठी खर्च करत आहे. रंगरंगोटी, दिव्यांचा झगमगाट पालिकेकडून केला जातोय. मात्र याची गरज नसून ज्या मूलभूत गरजा आहेत त्यावर पालिकेने खर्च करायला हवा. कचरा, पाणी, खड्डेमुक्त रस्ते चांगल्या सोयीसुविधा यावर पालिकेने खर्च करायला हवा. - अनिल कोकीळ, माजी नगरसेवक, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

 

Web Title: substandard materials used for beautification former corporators criticize the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.