केबलवॉरच्या छायेत उपनगर

By admin | Published: May 27, 2015 12:20 AM2015-05-27T00:20:08+5:302015-05-27T00:20:08+5:30

आपापल्या टोळ्या घेऊन समोरासमोर उभे ठाकल्याने या संघर्षातून नजीकच्या काळात केबलवॉर भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Suburb of Cablevor's Shade | केबलवॉरच्या छायेत उपनगर

केबलवॉरच्या छायेत उपनगर

Next

मुंबई : पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसरपर्यंतचा अधिकाधिक ग्राहकवर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी दोन बड्या केबल कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेत छोटा राजन टोळीचा रियाज भाटी आणि छोटा शकील टोळीचा बच्ची सिंग आपापल्या टोळ्या घेऊन समोरासमोर उभे ठाकल्याने या संघर्षातून नजीकच्या काळात केबलवॉर भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आपल्या कंपनीची कनेक्शनसंख्या वाढावी यासाठी हॅथवे आणि सेव्हनस्टार या दोन्ही कंपन्यांनी आॅपरेटरना पाठबळ देण्याचे प्रकार पूर्वीपासूनच सुरू आहेत. यातूनच पश्चिम उपनगरात दररोज कुठे ना कुठे विरोधी कंपनीच्या केबल ग्राहकांची केबलवायर कापून आपल्या कंपनीची कनेक्शन्स टाकण्याचे प्रकार आॅपरेटरकडून सुरू आहेत. त्यातून केबल आॅपरेटरमध्ये आपापसात वाद होत आहेत.
मात्र आता या वादात आपापली मसलपॉवर दाखवण्यासाठी दोन्ही गटांच्या आॅपरेटरनी प्रत्येकी रियाज भाटी आणि बच्ची सिंगला हाताशी धरले आहे. मिल्लत नगर येथे व्यावसायिक एजाज खान हत्या प्रकरणातील सध्या जामिनावर सुटलेला एक आरोपी अतार खान ऊर्फ पापा हाही रियाज भाटीसोबत या केबलवॉरमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. छोटा शकील टोळीपासून धोका असल्याची तक्रार करीत रियाज भाटी याने पोलीस बंदोबस्त मिळवला आहे. त्या बंदोबस्ताचा फायदा घेत तो विरोधी कंपनीच्या आॅपरेटरना धमकावत असल्याच्या तक्रारी आहेत.
अशा केबलवॉरमधून बांगूरनगर, समतानगर, वाकोला, डी.एन. नगर, खेरवाडी, विलेपार्ले, अंधेरी, वाकोला, गोरेगाव यासह अनेक पोलीस ठाण्यांमध्ये एकमेकांविरोधात अदखलपात्र तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. आजमितीस ही प्रकरणे अदखलपात्र म्हणून नोंदवण्यात आली असली तरी एकूणच धुमसते वातावरण पाहता, यातून केबलवॉर कमालीचे भडकण्याची शक्यता माहीतगारांकडून वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे या कंपन्यांच्या आॅपरेटरनी या केबलवॉरमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनाही हाताशी धरले आहे. यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या वांद्रे, अंधेरी आणि कांदिवली युनिटमधील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केबल व्यवसायातील बहुसंख्य आॅपरेटर हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने हे आॅपरेटर शक्यतो पोलीस ठाण्यात जाण्याचे टाळतात. पोलीस अधिकारीही आॅपरेटरच्या या पार्श्वभूमीचा फायदा घेत केबल कनेक्शन कापण्याच्या प्रकरणात त्यांना दमदाटी करून धमकावून हितसंबंधी आॅपरेटरचीच कनेक्शन कशी वाढतील, हेच पाहतात. रियाज भाटी हा सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने प्रतिस्पर्धी केबल आॅपरेटरना धमकावत असल्याच्या तक्रारी आहेत.
पश्चिम उपनगरात सदा कदम यांचाही केबल आॅपरेटर वर्तुळात दबदबा आहे. या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल लक्षात घेत राजकीय पक्षांनीही आॅपरेटरच्या संघटनांच्या माध्यमातून आपले जाळे पसरवण्यावर भर दिला आहे.
केबल आॅपरेटरचे स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याने वेळप्रसंगी क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी ते स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मध्यस्थी करण्याची विनंती करतात.
मात्र तरीही अनेकदा वाद टोकाला जातात. गेल्या काही दिवसांत धुमसत असलेला संघर्ष पाहता पोलीस आयुक्तांनी आणि सरकारनेही यात लक्ष घालून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे केबल आॅपरेटर आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)

अंधेरी परिसरातील केबलवॉर प्रकरणातून जुलै २0१४ मध्ये पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी याची गंभीर दखल घेत विेशेष तपासपथक (एसआयटी) स्थापन केले होते. मात्र पोलीस अधिकाऱ्यांचे केबलवॉरमधील वाढते हितसंबंध पाहता पोलीस आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे माहीतगारांकडून सांगण्यात येते.

प्रत्येक धंद्यात स्पर्धा असते तशी ती केबल व्यवसायातही आहे. याच स्पर्धेतून केबल आॅपरेटर वेगवेगळे मार्ग चोखाळतात. हे सारे थांबावे यासाठी आम्ही नियामक आयोगाकडे या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी सातत्याने करीत आहोत. उद्योगाचा दर्जा मिळाल्यास या व्यवसायाला कायदे लागू होतील आणि शिस्तही लागेल. कायदे पाळले गेले तर निकोप स्पर्धा निर्माण होऊन अखेर ग्राहकांचाच फायदा होईल. कायदे न पाळणाऱ्यांवर कारवाई करून सारे गैरप्रकार थांबवता येतील.
- अ‍ॅड. अनिल परब,
अध्यक्ष, केबल आॅपरेटर डिस्ट्रिब्युटर असोसिएशन

 

Web Title: Suburb of Cablevor's Shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.