मुंबई शहरापेक्षा उपनगर अधिक ‘उष्ण’; गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:54 AM2019-04-25T05:54:09+5:302019-04-25T05:54:31+5:30
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच मुंबईचा विचार करता मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील ठिकठिकाणांचे कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच मुंबईचा विचार करता मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील ठिकठिकाणांचे कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांशी ठिकाणांच्या कमाल तापमानाने पस्तिशी गाठली असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबई शहराच्या तुलनेत उपनगर अधिक उष्ण आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात कुलाबा, वरळी, माझगाव, दादर, बीकेसी येथे कमाल तापमानाचा पारा ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आला आहे. सांताकु्रझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, आकुर्ली येथे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. बोरीवली, चेंबूर, घाटकोपर, पवई, जोगेश्वरी लिंक रोड, भांडुप, मुलुंडसह नेरूळ आणि पनवेल येथील कमाल तापमान ३५ अंशावर नोंदविण्यात आले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. दरम्यान, २५ एप्रिलला विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर, २६ ते २८ एप्रिलला विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
कोकण, गोव्याला पावसाचा इशारा
२५ ते २७ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
२८ एप्रिल : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.