उपनगरीय रुग्णालयात आता ‘निवासी डॉक्टर’; तीन महिने जिल्हा निवासी सेवा बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 08:06 AM2023-05-02T08:06:44+5:302023-05-02T08:07:11+5:30

२०२१ नंतरच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालयांत तीन महिने काम करणे बंधनकारक केले आहे.

Suburban hospitals now have 'resident doctors'; Three months District Resident Service Compulsory | उपनगरीय रुग्णालयात आता ‘निवासी डॉक्टर’; तीन महिने जिल्हा निवासी सेवा बंधनकारक

उपनगरीय रुग्णालयात आता ‘निवासी डॉक्टर’; तीन महिने जिल्हा निवासी सेवा बंधनकारक

googlenewsNext

संताेष आंधळे

मुंबई :  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयानुसार देशातील सर्व एमडी, एमएससारख्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना तीन महिन्यांसाठी जिल्हा रुग्णालयांत काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयांत राहण्याची व्यवस्था व इतर अडचणी लक्षात घेता मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांना पालिकेतील उपनगर, सरकारी रुग्णालयात काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारपासून जेजे, केईएम, नायर, कूपर, सायन रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची विविध उपनगरातील रुग्णालयांत नियुक्ती झाली आहे. या डॉक्टरांना तीन महिने त्या-त्या रुग्णालयांत सेवा द्यावी लागणार आहे.        

२०२१ नंतरच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालयांत तीन महिने काम करणे बंधनकारक केले आहे. जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सत्रात असलेल्या निवासी डॉक्टरांना रोटेशन पद्धतीने ही सेवा देता येणार आहे. मुंबईच्या हद्दीतील सर्व निवासी डॉक्टरांची जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत नियुक्ती करण्यासाठीची जबाबदारी  जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी मुंबईतील सर्व संबंधित महाविद्यालयांतील अधिष्ठातांची बैठक घेऊन नियुक्ती केली आहे. याकरिता जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गजानन चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.   

आयोगाचा हा कार्यक्रम सर्व निवासी डॉक्टरांना बंधनकारक असून, तो कसा योग्य पद्धतीने राबविता येईल. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल, यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांची नियुक्ती उपनगरीय रुग्णालयांत केली आहे. सर्वांना टप्प्याटप्प्याने पाठवले जाईल. - डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय

प्रत्येक महाविद्यालयातील ४० ते ५० निवासी डॉक्टरांची नियुक्ती त्याप्रमाणे उपनगरीय रुग्णालयांत करण्यात आली आहे. गरज असेल त्याप्रमाणे या डॉक्टरांची महापालिकेच्या दवाखान्यांत नियुक्ती केली जाईल.  - डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, महापालिका उपनगरीय रुग्णालये

Web Title: Suburban hospitals now have 'resident doctors'; Three months District Resident Service Compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.