मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला गेला असतानाच पश्चिम रेल्वेमार्गावरही रविवारी नेहमीप्रमाणे जम्बोब्लॉक घेण्यात आला. गोरेगाव ते बोरीवलीदरम्यान घेण्यात आलेल्या जम्बोब्लॉकमुळे उपनगरवासीयांना त्याचा मोठा फटका बसला. ओव्हरहेड वायर, रेल्वेरूळ आणि सिग्नल तसेच अन्य तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वेकडून जम्बोब्लॉक घेण्यात आला. गोरेगाव ते बोरीवलीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आल्याने उपनगरवासीयांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. या मार्गावरील जलद लोकल गोरेगाव ते बोरीवलीदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना बसत होता. धीम्या मार्गावर जलद लोकलही येत असल्याने लोकल पकडताना अनेकांची तारांबळ उडत होती. काही स्थानकांवर उद्घोषणा होत नसल्याने तसेच इंडिकेटर्सही बंद असल्याने धीम्याऐवजी जलद लोकल काही प्रवासी पकडत होते. त्यामुळे पुढील स्थानकावर उतरून त्या प्रवाशांना पुन्हा परतीचा मार्ग पत्करावा लागत होता. ब्लॉकदरम्यान बोरीवली ट्रेनला बोरीवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७, ८ आणि २ तर विरार ट्रेनला बोरीवलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ किंवा ३वर थांबा देण्यात येत होता. ब्लॉकमुळे लोकल १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांवर तसेच लोकल गाड्यांना गर्दीच गर्दी होत होती. या गर्दीतून प्रवास करतान वृद्ध, महिलांची फरफट होत होती.
उपनगरवासीयांना मेगा ब्लॉकमुळे मोठा फटका
By admin | Published: September 22, 2014 1:26 AM