Join us

धर्मादाय आयुक्तालयाच्या मोहिमेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:36 AM

मुंबईसह राज्यभरातील धर्मादाय कार्यालयात प्रलंबित असलेल्या विनावाद बदल अर्ज निकाली काढण्यासाठी, धर्मादाय आयुक्तालयाने राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील धर्मादाय कार्यालयात प्रलंबित असलेल्या विनावाद बदल अर्ज निकाली काढण्यासाठी, धर्मादाय आयुक्तालयाने राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘झीरो पेंडन्सी’ या अभियानांतर्गत राज्यातील २५ वर्षांपासून प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे काम धर्मादाय आयुक्तालयाने केले आहे.विश्वस्त मंडळातील नवीन नेमणूक, मंडळाकडून नवीन मालमत्तेची खरेदी, एखाद्या विश्वस्ताचे निधन, राजीनामा, नवी नेमणूक, निवडणूक प्रक्रियेद्वारे झालेली विश्वस्तांची निवड किंवा संस्थेच्या पत्त्यातील बदल, अशा विविध बदलांसाठी संस्था, संघटनांना धर्मादाय कार्यालयाची मान्यता घ्यावी लागते. मात्र, असे बदल अर्ज निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा नसल्याने प्रलंबित अर्जांची मोठी संख्या होती. यासाठी राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान ‘झीरो पेंडन्सी’ अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्यातील सर्व धर्मादाय उपायुक्त, सहायक धर्मादाय उपायुक्तांनी कार्यालयातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यात राज्यभरातून ५ हजार ५८९ विना वाद बदल अर्ज निकाली काढण्यात आले. यात पाच वर्षांपासून प्रलंबित असलेले ३,८३१, दहा वर्षांपासून प्रलंबित असणारे १,४८९, पंधरा वर्षांपासून प्रलंबित असणारे १७६, वीस वर्षांपासून प्रलंबित असणारे ८९, तर चार वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ४ विनावाद बदल अर्जांचा समावेश आहे.निकाली निघालेल्या अर्जात सर्वाधिक मुंबई शहर आणि उपनगरातील २,८६१ अर्जांचा समावेश आहे. काहीही वाद नसताना बदल अर्ज प्रलंबित राहिल्याने, धर्मादाय संस्थांच्या कारभारावरही परिणाम होतो. जोपर्यंत धर्मादाय कार्यालयाकडून बदल अर्ज निकाली काढला जात नाही, तोपर्यंत संबंधित बदल अथवा विश्वस्त मंडळाची कार्यवाही वैध मानली जात नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाºया सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध संस्था, संघटना आणि मंडळांच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होत असतो. कसलाच वाद नसताना, धर्मादाय कार्यालयात चकरा माराव्या लागतात.>कार्यालयनिहाय निकाली निघालेले अर्जमुंबई शहर आणि उपनगर २,८६१, पुणे ५९४ , नाशिक ४३८, कोल्हापूर ३७९, सांगली २३५, रत्नागिरी २५१, उस्मानाबाद २२६, सातारा १९७, नागपूर ८४, ठाणे ६१, अहमदनगर ४८, जळगाव ४६, धुळे ४१, सोलापूर ३७, रायगड २९, परभणी २१, अकोला ११, बीड ६, सिंधुदुर्ग ६, नंदुरबार ५, जालना ४, यवतमाळ आणि वाशिम प्रत्येकी ३, वर्धा २ आणि औरंगाबाद १.