लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संसर्गाची स्थिती टप्प्याटप्प्याने नियंत्रणात आणून मिशन झिरो साध्य करण्याचे लक्ष्य मुंबई पालिका प्रशासनाने समोर ठेवले आहे. यामध्ये मुंबईकरांचे सहकार्य लाभत असून, त्याचा एकत्रित परिणाम म्हणून संसर्ग नियंत्रणात येत आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
कोविडची लक्षणे असलेले रुग्ण, कोविडबाधितांचे अतिजोखमीचे सहवासित, प्राणवायू पातळी कमी दर्शवणारे ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार व सहव्याधी असलेले नागरिक अशा सर्वांच्या चाचण्या करण्यात येतात.
* विलगीकरणाची कार्यवाही
रेल्वेस्थानक, विमानतळ, व्यापारी संकुल, बाजारपेठा, फेरीवाले क्षेत्र अशा सार्वजनिक जागीही महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर चाचण्या करून बाधितांना वेळीच शोधून विलगीकरणाची कार्यवाही केली आहे.
* त्रिसूत्रीचे पालन
मास्कचा उपयोग, सॅनिटायझरचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन मुंबईकर तुलनेने चांगल्या रीतीने करतात. मुंबईत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेनंतर माझा मास्क, माझी सुरक्षा मोहीम राबविली गेली आहे. याचा परिणाम म्हणूनही संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली आहे.
------------------------------