Join us

श्वसननलिकेत अडकलेली गोटी काढण्यात यश, मुंबईत श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

मुंबई : श्वानाच्या श्वसनलिकेत अडकलेली काचेची गोटी यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात मुंबईतील पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. परळमधील खासगी ...

मुंबई : श्वानाच्या श्वसनलिकेत अडकलेली काचेची गोटी यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात मुंबईतील पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. परळमधील खासगी रुग्णालयात श्वानावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पेण येथील एका सात महिन्याच्या पाळीव मादी लॅबरेडोर श्वानाला मागील दीड महिन्यापासून सतत उलट्या आणि खोकल्याच्या त्रास जाणवत होता. त्या श्वानावर स्थानिक क्लिनिकमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. उपचार करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे श्वानाच्या मालकांना दिसून आले.

जास्तच त्रास होऊ लागल्याने या श्वानाला पुढील उपचारांसाठी परळ येथील सुयश पेट क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. श्वानाचा एक्स-रे काढला असता श्वसननलिकेत काचेची गोटी अडकली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही काचेची गोटी श्वानाच्या श्वसननलिकेतून फुप्फुसापर्यंत जाऊन पोहोचली होती. डॉ. एस. डी. त्रिपाठी आणि डॉ. जी. एस. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोपोफॉल एन्थेसिया अंतर्गत ब्रॉन्कोस्कोपी केली. या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मोठ्या परिश्रमाने आणि काळजीपूर्वकरीत्या श्वानाच्या श्वसननलिकेतील काचेची गोटी एंडोस्कोपिक बास्केटने बाहेर काढली. या शस्त्रक्रियेनंतर श्वानाची तब्येत अत्यंत चांगली असल्याचे सुयश पेट क्लिनिकचे डॉ. गौरव खांडेकर यांनी सांगितले.

.............................................

डॉ. गजेंद्र खांडेकर (प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय पशुशैल्य चिकित्सा विभाग) -

श्वान मालकांचे आपल्या श्वानाकडे नेहमी लक्ष असायला हवे. श्वानाच्या शरीरात आंब्याची कोय, हाड, चेंडू, काचेची गोटी, मास्क अडकल्याच्या तक्रारी आमच्याकडे बऱ्याचदा येतात. मात्र श्वानाच्या श्वसननलिकेत एखादी वस्तू अडकण्याची ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे.