सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश, जंजिरा किल्ल्यावर 365 दिवस तिरंगा फडकावण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:14 AM2018-09-25T11:14:01+5:302018-09-25T11:15:36+5:30
जंजिरा किल्ल्यावर आतापर्यंत केवळ 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी आणि 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकावण्यात येत होता.
मुंबई - जंजिरा किल्ल्यावर आतापर्यंत केवळ 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी आणि 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकावण्यात येत होता. मात्र सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता 365 दिवस तिरंगा ध्वज फडकवण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे. यासंदर्भात सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धन प्रमुख गणेश रघुवीर यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत केंद्र शासनाने हे आदेश दिले आहेत.
तिरंग्याचा मान राखत तो फडकवण्यात यावा, असे आदेश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. लवकरच या संदर्भातील तारीखही जाहीर केली जाणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र शासनाने हे आदेश दिल्याची माहिती गणेश रघुवीर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. याआधी 100 हून अधिक किल्ल्यांवर एकाच दिवशी भगवा ध्वज फडकावण्याची किमया सह्याद्री प्रतिष्ठानने केली होती.