मुंबई : एरवी धार्मिक विधी व राजकीय इफ्तार पार्ट्यांमुळे चर्चेत राहिलेल्या हज हाउसचा माहौल गेल्या दोन दिवसांत आगळ्या कारणाने गजबजून गेला आहे. या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रात काही वर्षे तयारी केलेल्या दोघा युवकांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. सलमान पटेल व जुनेद अहमद अशी त्यांची नावे असून दोघांना अनुक्रमे ३३९ व ३५२वा क्रमांक मिळाला आहे.सलमान हा मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, जुनेद हा उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. दोघे जण येथील हज कमिटी आॅफ इंडियातर्फे चालविल्या जाणाऱ्या स्टडी सेंट्रलमध्ये दोन वर्षे अभ्यास करीत होते. त्यानंतर ते अधिक अभ्यासासाठी दिल्लीतील जामिया उस्मानाबाद विद्यापीठातील केंद्रात सामील झाले होते. सलमान पटेलच्या वडिलांची दोन एकर शेती असून त्याने विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे. बिजनोरच्या जनुेद अहमदचे वडील वकील असून त्याने इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन या विषयातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर स्वत:ला स्पर्धा परीक्षेत झोकून दिले. सुरुवातीला रोज साधारण ८ ते १० तास ते अभ्यास करीत होते. त्यानंतर वेळेपेक्षा विषय समजून घेत त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले. त्यासाठी हज हाउसमधील स्टडी सेंट्रल तसेच दिल्लीतील अभ्यास केंद्राचा खूप फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘हज हाउस’ केंद्रातील दोघांचे यूपीएससीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:33 AM