लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळत गेले की जीवन जगण्यात खरी मजा येते. यशामुळेच जीवनाच्या मैफलीत रंग भरले जातात, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा लेखक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले.
‘यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडताना’ या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. शरीरस्वास्थ, उपासना, प्रत्येक कामाशी आणि नात्याशी प्रामाणिकता, निःस्वार्थ प्रेम, समतोल, संयम आणि दातृत्त्व हे यशाचे सात मंत्र त्यांनी या वेळी उलगडून दाखविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रारावीकर यांच्या कर्तृत्त्वावर प्रकाश टाकणारी चित्रफित सादर करण्यात आली. त्यांच्या अर्थशास्त्रज्ञ, लेखक, साहित्यकार, गायक, वक्ता, तत्त्वज्ञ, विचारवंत अशा बहुरंगी भूमिकांचा वेध घेण्यात आला.
स्वलिखित ‘यश पुष्प’ या पुस्तकातील सौंदर्यस्थळे उलगडताना डॉ. रारावीकर यांनी त्यातील मौलिक विचारांचे विस्तृत विवेचन केले. देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये योगदानाची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. अर्थशास्त्राचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करण्याचा आपला मानस त्यांनी बोलून दाखवला. अध्यात्म, संगीत, संस्कृत अशा विषयांवरही त्यांनी विचार मांडले.
‘आई-वडील हे माझे कल्पवृक्ष होते’ हे सांगताना ते भावुक झाले. कार्यक्रमादरम्यान त्यांना गाणे सादर करण्याची फर्माइशही करण्यात आली. ‘आयुष्याच्या नंदनवनात यशाचं हास्य पुष्प सर्वांच्या चेहऱ्यावर फुलावं’ अशी भावना त्यांनी कार्यक्रमाच्या समारोपात व्यक्त केली.