लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अपेंडिक्सची शस्त्रक्रिया म्हटली म्हणजे अनेकवेळा पोटाच्या एका बाजूला छेद घेऊन ती शस्त्रक्रिया केली जाते, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र या प्रचलित शस्त्रक्रियेला प्रक्रियेला छेद देत जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेवर तोंडाद्वारे एन्डोस्कोपीने जाऊन अपेंडिक्सची शस्त्रक्रिया केल्यामुळे वैद्यकीय विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. या शस्त्रक्रियेत त्या महिलेच्या पोटावर कोणताही छेद न घेतल्यामुळे शरीरावर कोणताही व्रण दिसत नाही.
नाशिक येथे राहणाऱ्या दृष्टी भोसले (३२) वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्या जे जे रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांचे अपेंडिक्सचे निदान करण्यात आले आणि त्यांना संभाव्य शस्त्रक्रियेची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या दोन्ही गरोदरपणात दोन सिझेरिअन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे सांगून वेगळा काही पर्याय आहे का? याची डॉक्टरांकडे विचारणा केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय विश्वात माहिती असलेली मात्र फार कुणी करत नसलेल्या नोट्स या तंत्राचा वापर करत ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सरकारी रुग्णालयात या अशा पद्धतीची आधुनिक शास्त्रक्रिया करण्याची महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. कारण यामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या वस्तूचा खर्च येतो. तसेच यंत्र अत्याधुनिक स्वरूपाची लागतात. मात्र आम्ही ही शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. यामध्ये भूलतज्ज्ञाची भूमिका फार महत्त्वाची असते. ही शस्त्रक्रिया करताना भूलतज्ज्ञ डॉ. कुंदन गोसावी आणि त्याचे सहकारी तसेच ही शस्त्रक्रिया डॉ. शिरीष भागवत यांच्या युनिटमध्ये करण्यात आली. त्या सगळ्यांचे सहकार्य यासाठी लागले. - डॉ. अजय भंडारवार, जनरल सर्जरी विभाग, जे जे रुग्णालय
नोट्सद्वारे शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना सर्जरी विभागाचे डॉ. अमोल वाघ यांनी सांगितले की, या तंत्रात अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेकरिता महिलेच्या पोटावर कुठलाही छेद घेत नाही. त्यामध्ये पोटाची तपासणी करण्यासाठी तोंडाद्वारे जी एन्डोस्कोपी केली जाते. या एन्डोस्कोपीच्या यंत्रात थोडे फार बदल करून तोंडाद्वारे पोटात जाऊन आतमध्येच छेद घेऊन अपेंडिक्स बाहेर काढले जाते. यासाठी पोटात ज्या ठिकणी छेद घेतला आहे. त्या ठिकाणी टाके घेण्यासाठी क्लिपचा वापर केला जातो. त्यामुळे जास्त रक्तस्त्राव होत नाही. रुग्णाला घरी लवकर जाता येते.