Join us

३७ दिवस, हिमवर्षाव, उंच बर्फाच्या भिंती, अन्...; माउंट मेरू शिखरावर चढाईचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 9:03 AM

हिमालयातील गंगोत्री परिसरातील शिखरे बर्फांनी आच्छादलेली असून गिर्यारोहकांना आकर्षित करतात.

मुंबई -  हिमालयातील गंगोत्री परिसरातील माउंट मेरू (६,६६० मी.) या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण अशा शिखराच्या पश्चिम कड्यावर भारतातील पहिला चढाईचा प्रयत्न गिरिप्रेमी संघाने मे-जून २०२३ दरम्यान केला. प्रतिकूल परिस्थितीत शर्थीचे प्रयत्न करून संघ शिखरमाथ्याच्या अगदी जवळ ६२०० मीटरपर्यंत पोहोचला. परंतु, सततच्या खराब हवामानामुळे संघाला मागे फिरावे लागले. गेल्या अनेक वर्षांत या शिखराच्या पश्चिम बाजूने चढाईचे कोणीही साहस केले नाही. गिरिप्रेमी संघाने ३७ दिवस वादळ, वारंवार होणारे हिमवर्षाव, उणे तापमान; उंच बर्फाच्या भिंती आणि हिमभेगा यांचा सामना केला.

मे-जूनदरम्यान झालेल्या शिखरचढाईच्या प्रयत्नांची, भव्यदिव्य हिमालयाचे अनोखे रूप दाखवणारी चित्तथरारक फिल्म तयार झाली आहे. यामध्ये मोहिमेच्या तयारीपासून ते शिखरमाथ्याच्या अगदी जवळ म्हणजेच ६,२०० मीटरपर्यंतचा प्रवास सर्वांना अनुभवता येणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर या ठिकाणी बेस कॅम्प लागत असल्याने योग्य जागा निवडणे, १७०० किलो साहित्य गंगोत्री ते मेरू बेस कॅम्पपर्यंत पायी चालत जाऊन पोहोचविणे, प्रत्यक्ष चढाईचा मार्ग निश्चित करणे, पुढील कॅम्पची जागा निश्चित करणे, त्या ठिकाणी लागणाऱ्या चढाईचे, राहण्याचे, खाण्याचे साहित्य पोहोचविणे, उभ्या कड्यांवर दोर लावणे, हिमप्रपात, हिमभेगांचा अंदाज घेऊन सुरक्षितरीत्या चढाई करणे, बर्फाच्या भिंतींवर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून चढाई करणे, याव्यतिरिक्त हवामानाची उघडझाप या सर्वांचे चित्रीकरण सर्व गिरिप्रेमींना या फिल्ममध्ये अनुभवता येणार आहेत. याचसोबत मोहिमेचा संघ त्यांच्या चित्तथरारक अनुभवांचे कथन या फिल्मनंतर करणार आहेत. दरम्यान, हा अनुभव नक्कीच रोमांचकारी होता असे यातील सगळ्या सदस्यांनी सांगितले.