पालिका रुग्णालयांत पार पडली यशस्वी बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:05 AM2019-10-01T06:05:26+5:302019-10-01T06:06:21+5:30
गेल्या काही वर्षांत स्थूलत्वाची समस्या वाढते आहे. त्यामुळे स्थूलत्वाविषयी होणारे उपचार केवळ खासगी रुग्णालयांत केले जातात.
मुंबई : गेल्या काही वर्षांत स्थूलत्वाची समस्या वाढते आहे. त्यामुळे स्थूलत्वाविषयी होणारे उपचार केवळ खासगी रुग्णालयांत केले जातात. मात्र, नुकतीच महापालिकेच्या रुग्णालयांत याविषयी यशस्वी उपचार करण्यात आले. जन्मत:च स्थूलत्व असलेल्या मुलीचे वजन कमी करण्यासाठी वेटलिफ्टिंगचा पर्याय अवलंबिला, ते करता-करता राज्यस्तरावर पदकही पटकावले. मात्र, तरीही वजन कमी होत नव्हते. त्यामुळे अखेर तिला बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. खर्च परवडत नसल्याने तिने सायन रुग्णालयात बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया केली आणि तिचे वजन सात किलोने कमी झाले.
अॅनी जेसन (१६) या मुलीला स्थूलत्वाचा आजार झाला. वजन तब्बल १४२ किलो झाल्याने चालणे मुश्कील झाले. वजनामुळे तिच्या पायात व्यंगत्वाला सुरुवात झाली होती. त्यावेळी अॅनीच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खासगी रुग्णालयात बेरिअॅट्रिक सर्जरीसाठी लाखो खर्च होत असल्याने, तिच्या कुटुंबीयांनी डॉ. संजय बोरुडे यांचा सल्ला घेतला. डॉ. बोरुडे यांनी सायन रुग्णालयात तिची शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर तिचे वजन सात किलोने कमी झाल्याचे सांगण्यात आले. तिचे पुढील निरीक्षण डॉ. निखिल भारद्वाज यांच्या निरीक्षणाखाली नायर रुग्णालयात झाले.
कमी खर्चात शस्त्रक्रिया
खासगी रुग्णालयात होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया आता सार्वजनिक रुग्णालयांमध्ये शक्य आहेत. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाच्या तुलनेत कमी खर्च येत असल्याचे सांगितले. पालिका रुग्णालयात १ ते दीड लाख खर्च येत असल्याची नायर रुग्णालय अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.