आठ दिवसांच्या बाळाची मृत्यूशी यशस्वी झुंज; वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:49 AM2020-07-03T01:49:12+5:302020-07-03T07:09:50+5:30
दुर्मीळ हृदयदोषावर उपचार, जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ज्ञांची भेट घेतली.
मुंबई : अहमदनगर येथे जन्मलेल्या बाळाला आठवड्याभरातच श्वास घेण्यात अडथळे येऊ लागल्याने पालकांनी बाळाच्या उपचारांकरिता परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल गाठले. बाळामध्ये असलेला दुर्मीळ हृदयदोष दूर करण्यासाठी डॉक्टरांनी बलून ‘एओर्टिक वाल्वोटॉमी’ ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून बाळाला नव्याने जीवनदान मिळाले.
अहमदनगर येथील जोडप्याला घरी बाळाचे आगमन झाल्याचा प्रचंड आनंद झाला होता. बाळाचे वजनही निरोगी बाळाप्रमाणेच २.५ किलो इतके होते. जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ज्ञांची भेट घेतली. त्यावेळी इकोकार्डियोग्राफी तपासणी दरम्यान बाळाच्या श्वासाचा वेग वाढणे तसेच हृदयदोष आढळून आला. तसेच बाळाच्या महाधमनीत ब्लॉकेज दिसून आले. बाळाच्या पालकांनी त्याला त्वरित रुग्णवाहिकेने मुंबईच्या दिशेने धाव घेत वाडिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. बाळाचा हार्ट पंपिंग रेट १५ टक्के इतका कमी असून सर्वसामान्यांमध्ये तो कमीत कमी ५५ टक्के इतका असतो.
बाळाची प्रकृती खालावली होती. बालरोग कार्डियाक एनेस्थेटिस्ट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, नर्सिंग आणि तांत्रिक टीमसह कार्डियाक टीमने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरेक्षेविषयी आवश्यक ती सारी खबरदारी घेत बाळाच्या शस्त्रक्रियेकरिता सज्ज झाले होते. चार विविध थरांनी सुरक्षित अशा पीपीई किटचा वापर शस्त्रक्रियेवेळी करण्यात आला. बाळाला त्वरित विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले आणि श्वासोच्छवासाच्या तीव्र अडचणी लक्षात घेता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
बाळाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून बलून एओर्टिक वॉल्वोटॉमी किंवा बलून एओर्टिक व्हॅल्व्हुलोप्लास्टीमध्ये डिफिलेटेड बलूनसह कॅथेटरचा वापर करून हृदयाचा कॅथेटरिझेशनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. कॅथेटर रक्तवाहिनीत घातला जातो. हे अरुंद व्हॉल्वमध्ये हलविले जाते आणि हृदयाच्या झडप उघडण्यासाठी फुगा फुगविला जातो. ही जोखमीची शस्त्रक्रिया दोन तास चालली. त्यानंतर इकोकार्डिओग्राफीने हृदय पंपिंग क्षमतेत त्वरित सुधारणा दर्शविली. बाळाची कोविड चाचणी नकारात्मक होती.
तथापि, आईची पॉझिटिव्ह चाचणी झाली आणि तिला आयसोलेशनच्या कारणाने कस्तुरबा रुग्णालयात हलवावे लागले. त्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. बाळाला लवकरच घरी सोडण्यात येईल. याविषयी, वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले, लहानग्यांना गंभीर आरोग्य दोषांवर उपचार करÞण्यास रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे. या माध्यमातून दर्जात्मक सेवा दिल्याचे समाधान आहे.
हा जन्मजात दोष एकूण लोकसंख्येच्या २ टक्के बाळांमध्ये दिसून येतो, त्यापैकी १५-२० टक्के हृदयाच्या झडपा ब्लॉकेज, तर २५ टक्के बाळांमध्ये जन्माच्या एक महिन्यानंतर ही स्थिती पाहायला मिळते.. कोविड-१९च्या चाचणीसाठी बाळ आणि आईची स्वॅब टेस्ट करण्यात आली. बाळाची प्रकृती पाहता हार्ट वॉल्व उघडण्यासाठी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शल्यक्रिया करण्यास उशीर केल्याने कदाचित त्याचे आयुष्यही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच बाळाला त्या प्रक्रियेसाठी कार्डियाक कॅथेटरिझेशन प्रयोगशाळेत हलविण्यात आले.