अडीच वर्षांच्या मुलावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
By admin | Published: June 1, 2016 04:19 AM2016-06-01T04:19:43+5:302016-06-01T04:19:43+5:30
जीवघेण्या व्याधीसह जन्माला आलेल्या श्रीराज जेधे या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जणू त्याला पुनर्जन्म दिला आहे.
मुंबई : जीवघेण्या व्याधीसह जन्माला आलेल्या श्रीराज जेधे या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जणू त्याला पुनर्जन्म दिला आहे. गायत्री या श्रीराजच्या २९ वर्षांच्या आईनेच आपल्या कलेज्याच्या या तुकड्यासाठी स्वत:च्या यकृताचे अंशत: दान केले.
पाच महिन्यांचा असताना श्रीराजच्या ओटीपोटाचा आकार खूपच वाढला. सोनोग्राफी केली असता त्याच्या यकृतात बराच द्रवसंचय झाल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीस त्याच्यावर परळ येथील बाई जेरबाई वाडिया लहान मुलांच्या इस्पितळात उपचार केले गेले.
अनेक चाचण्या व तपासण्यांनंतर श्रीराजला ‘बड-चिआरी सिन्ड्रोम’ अशा वैद्यकीय नावाने ओळखली जाणारी दुर्मीळ व्याधी असल्याचे निदान झाले. यात यकृतातील रक्तवाहिन्या रक्ताच्या गाठी झाल्याने अवरुद्ध होतात. यामुळे यकृतातील अंत:स्रावी द्रवाचा निचरा न होता ते तेथेच साठून राहते. अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळात अलीकडेच श्रीराजवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तेथील बालरोगतज्ज्ञ डॉ. साईस्ता अमिन यांनी सांगितले की, सुरुवातीस आम्ही श्रीराजच्या यकृताच्या धमन्यांमधील गाठी विरघळविण्यासाठी त्याच्यावर रक्त पातळ करण्याचे औषधोपचार केले. त्यानंतर सुमारे दोन वर्षे फॉलो-अप उपचार सुरू होते. डॉ. अमिन म्हणाल्या की, या वर्षाच्या सुरुवातीस श्रीराजला ‘लिव्हर सिरॉसिस’ होऊन त्याचे यकृत पूर्णपणे निकामी होण्याची अवस्था आली. अशा वेळी यकृताचे प्रत्यारोपण करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला.
इस्पितळाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विनय कुमारन म्हणाले की, खरेतर, एवढ्या लहान मुलावर अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे हे एक आव्हान होते. पण सर्वकाही सुरळीतपणे पार पडले व आता श्रीराज व त्याच्या आईची प्रकृती उत्तम आहे, असे डॉ. कुमारन यांनी सांगितले.
भारतात लहान मुलांमध्ये ‘बड-चिआरी सिन्ड्रोम’ ही व्याधी बऱ्याच प्रमाणात आढळून येत आहे. एकट्या मुंबईमध्ये सुमारे ३०० लहान मुले या व्याधीने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे.