मुंबई : रुग्ण आणि मूत्रपिंडदाता या दोघांचेही रक्तगट वेगळे असताना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया मुंबईतील खासगी रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. भिन्न रक्तगटातील मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीमधील लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.देशभरात गेले चार महिने अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. आता मात्र अनलॉकनंतर या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्याअंतर्गत अभिषेक गुप्ता(३९) यांचे तीन वर्षांपूर्वी मूत्रपिंड निकामी झाले. तेव्हापासून ते डायलिसिसवर आहेत. त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती असल्याने गेल्या चार महिन्यात ही प्रक्रिया करणे शक्य झाले नाही. गुप्ता यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे. त्यांना याच रक्तगटाच्या किडनीची आवश्यकता होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.गुप्ता यांना त्यांच्या पत्नीने मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शवली होती. एखाद्या रुग्णाला अवयव प्रत्यारोपणाची गरज भासल्यास त्याच रक्तगटाच्या व्यक्तीचा अवयव असणे गरजेचे असते. मात्र, त्यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. त्यामुळे भिन्न रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रिया राबवणे आव्हानात्मक होते. तसेच, भिन्न रक्तगटाच्या व्यक्तींमधील प्रत्यारोपण केल्यास गुप्ता यांना संसर्ग होण्याची भीती होती. मात्र, डॉ. अश्विन पाटील, डॉ. ए. रावल, डॉ. सुधिरंजन दास, डॉ. जे. जी. लालमलानी यांच्या चमूने २७ जुलैला हे प्रत्यारोपण केले. गुप्ता यांना गेले काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या पत्नीला घरी सोडण्यात आले आहे. गुप्ता यांची प्रकृती चांगली असल्याने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याची माहिती रुग्णालयाच्या अॅकेडेमिक डॉ. ऋषी देशपांडे यांनी दिली.
भिन्न रक्तगटाची मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 2:47 AM