Join us

नव्वदी पार केलेल्या रुग्णांची यशस्वी मात, प्रबळ इच्छाशक्तीचे फलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 7:39 AM

पनवेलमध्ये राहणारे घनश्यामदास चंचलानी (९२) यांना अचानक ताप येऊ लागला होता.

मुंबई : वयोमानानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने कोरोनाचा सर्वांधिक धोका हा वयोवृद्धांना आहे. या विषाणूची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृद्धांचा आकडा अधिक आहे. परंतु, आता कोरोना या व्हायरसशी झुंज देत यातून सुखरूप बाहेर पडणा-या वयोवृद्धांची संख्याही वाढू लागली आहे. जिद्दी व इच्छाशक्तीमुळे हे वृद्ध कोरोनामुक्त होऊन पुन्हा सर्वसामान्य जीवन जगताहेत, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या घनश्यामदास चंचलानी (९२) आणि माधुरी संपत (९१) यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.पनवेलमध्ये राहणारे घनश्यामदास चंचलानी (९२) यांना अचानक ताप येऊ लागला होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. म्हणून कोविडची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांची स्वॅब टेस्ट आणि रक्तचाचणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यानंतर कुटुंबीयांना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील रूग्णालयात दाखल केले. याशिवाय, ९१ वर्षीय माधुरी संपत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. या महिलेच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याने त्या गेल्या सहा महिन्यांपासून अंथरुणात होत्या. परंतु, अचानक ताप आणि अंगदुखी होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी मूत्रात संसर्ग असल्याचेही समोर आले आहे. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.यासंदर्भात बोलताना रूग्णालयातील डॉ. बेहराम पारडीवाला म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. रुग्णालयात आले तेव्हा त्यांना खूप ताप होता. कुटुंबीयांचीसुद्धा कोविड चाचणी करण्यात आली होती. यात चंचलानी यांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोघांवर औषधोपचार सुरू करण्यात आले. दिवसातून तीन वेळा त्यांची आॅक्सिजन पातळी तपासत होतो. बारा दिवसांनंतर त्याची आॅक्सिजन पातळी सामान्य ९८ इतकी होती. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर घरी त्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस