१०८ वर्षांच्या आजोबांवर यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:54 AM2019-09-26T00:54:11+5:302019-09-26T00:54:24+5:30

मांडीचे हाड जोडले; अशक्त असल्याने डॉक्टरांपुढे होते आव्हान

Successful surgery on 3-year-old grandfather | १०८ वर्षांच्या आजोबांवर यशस्वी शस्त्रक्रिया

१०८ वर्षांच्या आजोबांवर यशस्वी शस्त्रक्रिया

googlenewsNext

मुंबई : शौचालयात पाय घसरून पडल्यामुळे १०८ वर्षांच्या गिरजादातगिरी गुरू देवगिरी या ज्येष्ठ नागरिकाला कोणत्याही आधाराशिवाय चालता येत नव्हते. काही दिवसांनी जागेवरून उठता येणेही शक्य झाले नाही. त्यांच्या मांडीच्या हाडावरील भागाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले़ वैद्यकीय चाचण्यांअंती १०८ या वयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

रुग्णाच्या पायाचा एक्सरे काढला असता, मांडीच्या हाडाचा भाग मोडलेला दिसून आला. त्यांचे वय आणि अशक्त शरीर पाहता, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे योग्य ठरेल का, हे पाहण्यासाठी काही प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. त्यानुसार, त्यांच्या डाव्या बाजूला हिप हेमिआर्थ्रोप्लास्टी (पार्शियल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. भूल देऊन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश दाते व त्यांच्या टीमने तसेच अ‍ॅनेस्थेशिओलॉजी डॉ. नवीन पजई यांनी शस्त्रक्रिया केली.

या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या टीमला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. रुग्ण अतिशय बारीक आणि त्यांची हाडे अतिशय अशक्त झालेली असल्यामुळे डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागली. प्रत्यारोपण केले जात असताना किती रक्त जात आहे, याकडे डॉक्टरांचे बारकाईने लक्ष होते़ कारण याबाबतीत थोडी जरी चूक झाली असती, तरी दुसरे एखादे फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता होती. शस्त्रक्रिया केली जात असताना रुग्णाच्या ईसीजीमध्ये खूप उतारचढाव होत होते, त्यामुळे शस्त्रक्रिया लवकरात लवकर संपविणे अत्यावश्यक होते. रुग्णाला हृदय व फुप्फुसांचे आजार असल्यामुळे अ‍ॅनेस्थेशियावर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागले. शस्त्रक्रियेनंतर एक दिवस रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवले गेले.

फिजिओथेरपीमध्ये रुग्णाने खूप चांगले सहकार्य दिले, पण तरीही डॉक्टरांना फिजिओथेरपीदेखील अतिशय काळजीपूर्वक व सावकाश करावी लागली़ कारण रुग्णाचे हृदय आणि फुप्फुसाचे आजार पाहता, तब्येतीची गुंतागुंत वाढू न देणे महत्त्वाचे होते. त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलविण्यात आले़, तरीही फिजिओथेरपी सुरू ठेवली गेली. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर फिजिओथेरपीमध्ये वाढ करण्यात आली. अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया पार पडली. दोन आठवड्यांनी त्यांना घरी पाठविण्यात आले. त्या वेळी त्यांच्या सर्व जखमा पूर्णपणे भरलेल्या होत्या व ते वॉकरच्या साहाय्याने अतिशय आरामात चालत होते.

Web Title: Successful surgery on 3-year-old grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.