Join us

लहानग्या ओमच्या हृदयाच्या झडपेवर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:56 AM

अंधेरी येथील ओम गुप्ता या १० वर्षीय मुलावर थोरॅको अ‍ॅबडॉमिनल एआॅर्टिक अ‍ॅन्यूरिझम (टीएएए) रिपेअर शस्त्रक्रिया पार पडली आणि ओमला नवसंजीवनी मिळाली.

मुंबई : अंधेरी येथील ओम गुप्ता या १० वर्षीय मुलावर थोरॅको अ‍ॅबडॉमिनल एआॅर्टिक अ‍ॅन्यूरिझम (टीएएए) रिपेअर शस्त्रक्रिया पार पडली आणि ओमला नवसंजीवनी मिळाली. सततची डोकेदुखी आणि अभ्यासात एकाग्र न होणे या समस्यांमुळे ओमने शाळेत जाणे थांबविले होते. अतिरक्तदाबावरील अनेक औषधे घेऊनही दिलासा मिळत नव्हता आणि ओमला डोकेदुखीपासून बरे वाटावे यासाठी त्याच्या आईला सारखे त्याच्याजवळ बसून राहावे लागत होते. त्यांनी अंधेरीमधील डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर ओमचे सिटी स्कॅन करण्यात आले आणि ओमच्या हृदयाच्या झडपेला सूज आल्याचे निदान झाले.गिरगावातील रुग्णालयात ओमच्या हृदयाच्या झडपेवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयविकार शल्यविशारद डॉ. बिपीनचंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेविषयी सांगताना डॉ. भामरे म्हणाले की, ओमची अधिक तपासणी केली असता त्याला थोरॅकोअ‍ॅबडॉमिनल महाधमनीमध्ये विस्तृतवाहिनीचे विस्फारण (अ‍ॅन्यूरिस्मल डायलेशन) झाल्याचे निदान झाले. ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि घातक असते, जी शरीरातील महाधमनीवर परिणाम करते. टीएएए ओपन शस्त्रक्रिया हा एकच उपचार आहे. या शस्त्रक्रियेमध्ये २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. अ‍ॅबडॉमिनल महाधमनीचे विस्फारण हे मुलांमध्ये अत्यंत दुर्मीळ असते. ओमला झालेल्या संसर्गामुळे त्याच्या महाधमनीचे पटल कमकुवत झाले होते आणि त्यामुळे ते विस्फारले होते. महाधमनीचा आकार मोठा झाला होता आणि ती कोणत्याही क्षणी फाटली असती. त्यामुळे रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळे तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.या शस्त्रक्रियेत छाती आणि पोट उघडून महाधमनीच्या विस्फारणावर पॉलिएस्टरपासून तयार करण्यात आलेल्या विशेष ग्राफ्टचा वापर करून उपचार करण्यात येतात, असे डॉ. भामरे म्हणाले. रुग्णाच्या छातीची डावी बाजू आणि पोटाची मध्यरेषा एक मोठा छेद देऊन उघडली. सुमारे २० सेंटीमीटर महाधमनीच्या जागी पॉलिएस्टर ग्राफ्ट बसविण्यात आला. मूत्रपिंडाकडे जाणाºया रक्तवाहिन्यांचे ट्युब ग्राफ्टमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे लहान आणि मोठ्या आतड्याला तसेच यकृताच्या प्लीहाला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिन्यांचे ग्राफ्टमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले, असे डॉ. भामरे म्हणाले. यात छातीच्या खालील अर्ध्या अवयवांना रक्तपुरवठा करणारी नवी महाधमनी बसविण्यासारखेच होते. यामुळे उच्च रक्तदाबापासून दिलासा मिळेल आणि डोकेदुखी थांबेल. महाधमनीचे विस्फारीकरण म्हणजे काय? महाधमनीमध्ये आलेला गोळा किंवा सूज असते. या विस्फारीकरणात विविध अंतर्गत अवयवांना रक्तपुरवठा करणाºया छोट्या रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. ही परिस्थिती कोणत्याही वयोगटात उद्भवू शकते, विशेषत: वयाची चाळिशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये ही परिस्थिती आढळून येते. विस्फारीकरणामध्ये हळूहळू वाढ होते, त्यावर उपचार न केल्यास जेव्हा त्याचा एक विशिष्ट आकार होतो तेव्हा ते फाटते आणि अकस्मात मृत्यूसुद्धा होऊ शकतो.