विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनची चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 01:29 PM2020-11-25T13:29:28+5:302020-11-25T13:30:33+5:30
Electric vehicle charging station : अॅपद्वारे विद्युत वाहन चार्जिंग विषयी माहिती उपलब्ध
मुंबई : कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच नेशनल मोबिलिटी मिशन, २०२० ला चालना देण्यसाठी , महावितरणने कार्यान्वित केलेल्या ठाणे हिरानंदानी इस्टेट येथील रोमा विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनची चाचणी कार्यकारी संचालक (पायाभूत) प्रसाद रेशमे , मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) पुष्पा चव्हाण , भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या उपस्थितीत महावितरणने तयार केलेला मोबाईल अॅपद्वारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. यावेळी ठाणे मंडलचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाढत्या शहरीकरणामुळे गाड्यांचेही प्रमाण रस्त्यावर वाढत आहेत. त्यामुळेच प्रदूषण खूप वाढत चालले आहे आणि या प्रदुषणाला आटोक्यात आणण्यसाठी तसेच राष्ट्रीय इंधन सुरक्षा वाढविण्यासाठी, परवडणारी व पर्यावरणास अनुकूल वाहतूक पुरविण्यासाठी आणि भारतीय वाहन उद्योगास जागतिक उत्पादनात सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने नेशनल मोबिलीटी मिशन २०२० ची सुरुवात केली आहे. या मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राने सुद्धा स्वतःचे स्वतंत्र धोरण महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण जाहीर केले. या मध्ये आपली सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणने स्वखर्चाने पहिल्या टप्प्यात १० विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून , नवी मुंबई, ठाणे व पुणे येथे एकूण १० विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनची स्थापना करण्यात आली. त्याआधी नागपूर व पुणे या ठिकाणी एक-एक चार्जिंग स्टेशन प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
महावितरणने विद्युत वाहन धारकांसाठी एक सुलभ मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये नजीकच्या क्षेत्रामध्ये असलेले चार्जिंग स्टेशनची उपलब्धता, चार्जिंग स्टेशन पासून अंतर, चार्जिंग करण्यासठी लागणारे वेळ या सर्व गोष्टींची माहिती घेता येते. ज्यामुळे ग्राहकाला चार्जिंगसाठी आगाऊ नियोजन करणे सोयीस्कर होते तसेच चार्जिंग स्टेशन मानवरहित असल्यामुळे या अॅपद्वारे सेल्फ सेर्विस घेणे अत्यंत सुलभ होणार आहे. सध्या टाटा टेगोर व महिंद्रा या वाहनांना चार्जिंग करता येईल. चार्जिंगसाठी क्यू आर कोड स्कॅन केल्यावर वाहनधारकाच्या मोबाइल अॅपवर ओटीपी येईल, तो अोटीपी ( OTP) टाकून वाहनधारक चार्जिंग करू शकतो.
कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी यावेळी आव्हान केले की पर्यावरणासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या नेशनल मोबिलीटी मिशन २०२० ला चालना देण्यासाठी आपण प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. विद्युत वाहन खरेदी करुन आपण पर्यावरण प्रदूषणमुक्त करू शकतो. तसेच,इतर इंधनापेक्षा कमी खर्चात विद्युत वाहनाचा वापर करता येतो.