Join us  

हार्बरवर विद्युत परिवर्तन चाचणी यशस्वी

By admin | Published: March 14, 2016 2:20 AM

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री घेण्यात आलेली डायरेक्ट करंट (डीसी) ते अल्टरनेट करंट (एसी) विद्युत परिवर्तनाची चाचणी यशस्वी झाली आहे.

मुंबई : हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री घेण्यात आलेली डायरेक्ट करंट (डीसी) ते अल्टरनेट करंट (एसी) विद्युत परिवर्तनाची चाचणी यशस्वी झाली आहे. परिणामी, आता हार्बरवर डीसी ते एसी विद्युत परिवर्तन शक्य झाले आहे.हार्बर मार्गावर भविष्यात डीसी ते एसी विद्युत परिवर्तनासाठी आता विशेष ब्लॉक घेऊन परिवर्तन करण्यात येईल. या मार्गावर एसी विद्युत प्रवाहावर पहिली लोकल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालवण्यात येईल, तर बारा डब्यांची गाडी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालवण्यात येईल. सद्यस्थितीमध्ये हार्बर मार्गावरील सेवेसाठी ३६ रेक्स लागतात. त्यापैकी १७ रेक्स डीसी-एसी दोन्ही विद्युत प्रवाहावर चालणारे आहेत, तर १९ रेक्स डीसीवर चालणारे आहेत. परिणामी, एसीवर चालणारे रेक्स प्राप्त झाल्यानंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. एसी विद्युत प्रवाह सुरू झाल्यानंतर सुरुवातीला केवळ नऊ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येतील. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारा डब्यांची गाडी चालवण्यात येईल. कालांतराने सर्व गाड्या बारा डब्यांच्या करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नियोजनाप्रमाणे हार्बरवरील एकूण ३६ गाड्यांपैकी २० गाड्या ३० एप्रिलपर्यंत बारा डब्यांच्या करण्यात येतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हार्बर मार्गावरील तब्बल २०० फेऱ्या बारा डब्यांच्या चालविण्यात येतील. ३१ मेपर्यंत आणखी दहा गाड्या बारा डब्यांच्या करण्यात येतील. उर्वरित गाड्या जून महिन्यात बारा डब्यांच्या करण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)