दहा दिवसांच्या हृदयरोगग्रस्त बाळावर यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:08 AM2020-01-21T04:08:35+5:302020-01-21T04:08:40+5:30

अवघ्या १० दिवसांच्या बाळाची ओपन-हार्ट शस्त्रक्रिया वाडिया रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली.

Successful treatment for a ten-day-old baby | दहा दिवसांच्या हृदयरोगग्रस्त बाळावर यशस्वी उपचार

दहा दिवसांच्या हृदयरोगग्रस्त बाळावर यशस्वी उपचार

Next

मुंबई : अवघ्या १० दिवसांच्या बाळाची ओपन-हार्ट शस्त्रक्रिया वाडिया रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. या बाळाला जवळपास २५ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा जीवघेणा संसर्ग होऊ नये यासाठी अत्यावश्यक दक्षता घेतली जाणार आहे. ओपन-हार्ट सर्जरी झाल्यानंतर, बाळाने स्तनपानाचे सेवन केले असून त्याची वाढ चांगली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील गृहिणी असलेल्या कोमल उघडे आणि शेतकरी रामचंद्र उघडे या दाम्पत्याला १ डिसेंबर २०१९ रोजी जुळी मुले झाली. सिझरीयन पद्धतीने ही प्रसूती करण्यात आली. या वेळी एका बाळाचे वजन १ किलो तर दुसऱ्याचे वजन २ किलो होते. पती-पत्नीचा पुत्ररत्नांच्या लाभाचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्यातील एका बाळाची स्थिती नाजूक असल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले. श्वसनाला अडथळा व प्राणवायूचा स्तर अल्प असल्याने नवजात शिशूला शहापूर येथून वाडिया रुग्णालयातील बालअतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा म्हणाले, एकोकार्डीओग्राफीच्या साहाय्याने बाळाचे मूल्यमापन करण्यात आले, त्यातूनच टोटल अनोमलोस पल्मोनरी वेनोस कनेक्शन हा गुंतागुंतीचा हृदयरोग असल्याचे निदान झाले. हजार बाळांमध्ये १0 बाळे जन्मजात हृदयरोगग्रस्त असून १ लाख बाळांपैकी एकाला टीएपीव्हीसीची बाधा असते. यात फुप्फुसाच्या वाहिन्या या हृदयाच्या डाव्या बाजूला नव्हेतर, उजव्या बाजूला जोडलेल्या असतात. या रोगात केवळ शस्त्रक्रियेमुळे जीव बचावण्याची शाश्वती असते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बाळ हे अशक्त आणि संसर्गबाधित होते. या बाळाला जन्मानंतर श्वसनासंबंधी तसेच प्राणवायू स्तर कमी होण्याची समस्या होती. या बाळावर तब्बल ५ तास आपत्कालीन स्थितीतील तातडीची ओपन हार्ट-सर्जरी करण्यात आली. ज्यामुळे बाळाच्या शारीरिक समस्या दूर झाल्या. फुप्फुसाच्या वाहिन्या दुरुस्त करून डावीकडे जोडण्यात आल्या. त्यामुळे एट्रीयल दोष सुधारला.

बाळाची प्रकृती स्थिर
प्रमुख दुर्बलता आणि प्रीआॅपरेटिव्ह सेप्सिस यामुळे बाळाला जीवघेण्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी जवळपास २५ दिवसांचे वेंटिलेशन आणि क्रिटिकल केअर आवश्यक ठरणार आहे. ओपन हार्ट सर्जरीनंतर आता बाळ स्तनपान करीत असून त्याची वाढ सामान्य आहे.

Web Title: Successful treatment for a ten-day-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.