Join us

इथोपियातून आलेल्या दोन मुलांवर केले यशस्वी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:08 AM

मुंबई - कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरने दोन लहान बाळांवर कार्डियाक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा ...

मुंबई - कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरने दोन लहान बाळांवर कार्डियाक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली. ही बाळे इथियोपियाच्या अदिस अबाबामधून आली आहेत. त्यापैकी मुलगा केवळ २ महिन्यांचा तर मुलगी अवघी ५ महिन्यांची असून हे दोघेही गुंतागुंतीच्या जन्मजात हृदयविकारांनी आजारी आहेत. इथियोपियामधील सद्य: परिस्थितीमुळे आजाराच्या अचूक निदानासाठी इकोकार्डिओग्रॅम करणे कठीण होते; पण अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने या दोन्ही मुलांना मुंबईत आणले गेले व इतर सर्व औपचारिकता पूर्ण करून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले, हे करत असताना कोविड संसर्ग टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली गेली.

पेडियाट्रिक व काँजेनिटल हार्ट सर्जन व कन्सल्टन्ट डॉ. सुरेश राव यांनी सांगितले, इथियोपिया ते भारत या लांबलचक विमान प्रवासात स्वतःला व मुलांना कोविडपासून सुरक्षित राखणे आणि इतक्या कमी कालावधीत परदेशातील एका रुग्णालयात पोहोचणे या त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी खूपच वाखाणण्याजोगा आहेत. पेडियाट्रिक कार्डिऑलॉजिस्ट डॉ. तनुजा कारंडे म्हणाल्या, दोन महिन्यांच्या बाळाचे वजन फक्त चार किलो होते, त्याच्या हृदयामध्ये बरीच गुंतागुंत निर्माण झालेली होती.

त्याच्या हृदयात फक्त एकच पम्पिंग चेंबर होते, हृदयातून रक्त वाहून नेणाऱ्या मुख्य वाहिन्यांच्या दिशा चुकीच्या होत्या आणि एक मोठे छिद्र होते ज्यामुळे फुप्फुसांकडे मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत होते. या बाळावर गुंतागुंतीची ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करून मुख्य वाहिन्यांमधील दोष दूर केला गेला, हृदयात पुरेसे रक्त मिसळू शकेल याची सोय केली गेली आणि फुप्फुसांकडे होणाऱ्या रक्त प्रवाहात सुधारणा केली गेली. शस्त्रक्रियेनंतर पंधरा दिवसांनी या बाळाला सुस्थितीत घरी पाठवण्यात आले.

दुसरी होती ५ महिन्यांची छोटी मुलगी जी डाउन्स सिंड्रोम आणि हृदयातील एका गुंतागुंतीच्या विकाराने आजारी होती, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘कम्प्लिट ॲट्रिओवेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट’ असे म्हणतात, यामध्ये हृदयात चारऐवजी फक्त तीन झडपा असतात आणि दोन छिद्रे असतात. सुरुवातीच्या तपासण्या आणि विचारविनिमयानंतर या बाळावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमध्ये एका झडपेतून दोन झडपा तयार केल्या गेल्या व हृदयातील छिद्रे बंद केली गेली. बाळ आता सुखरूप असून त्याला लवकरच घरी पाठवले जाईल.