Join us  

दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी?; प्रवीण दरेकरांच्या चौकशीवर प्रसाद लाड यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 2:01 PM

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं.

मुंबई- भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मुंबई बँकत मजूर असल्याची नोंद करून संचालक मंडळावर गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दरेकरांना आज चौकशीला बोलावलं आहे. तसेच या चौकशीवर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी निशाणा साधला आहे. 

सरकारच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. सध्या दरेकरांची चौकशी सुरु असून, ते सहकार्य करत आहेत. पोलिसांना आम्ही देखील सहकार्य करत आहोत. पण दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी कशासाठी असा सवालही प्रसाद लाड यांनी केला आहे.  

दरम्यान, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिला आहे. प्रवीण दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर २९ मार्च रोजी उच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे वकील अखिलेश चौबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलेला दिलासा कायम ठेवण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांनी ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले.  नेमकं प्रकरण काय?

प्रवीण दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. 

टॅग्स :प्रवीण दरेकरप्रसाद लाडमुंबई पोलीस