मुंबई विद्यापीठाचा असाही विक्रम : ५ वर्षांपासून निकाल ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:19 AM2023-02-28T06:19:16+5:302023-02-28T06:19:27+5:30

राज्यपाल कुलसचिवांना स्वत: बोलले तरीही प्रशासन हलता हलेना

Such a record of the mumbai university: keeping the result for 5 years of one student on hold | मुंबई विद्यापीठाचा असाही विक्रम : ५ वर्षांपासून निकाल ठेवला राखून

मुंबई विद्यापीठाचा असाही विक्रम : ५ वर्षांपासून निकाल ठेवला राखून

googlenewsNext

- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालानंतर परीक्षेला बसता आले. तो परीक्षेत पासही झाला. मात्र, निकाल देण्यासाठी मुंबई विद्यापीठ तयार नाही. हा प्रकार तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कळल्यानंतर त्यांनी स्वत: कुलसचिव डॉ.सुनील भिरुड यांना थेट फोन केला, पण राज्यपालांच्या फोनलाही दाद मिळालेली नाही.

प्रवीण गांधी महाविद्यालयात मॅनेजमेंट स्टडिज विषयाचा अभ्यास करणाऱ्या दक्ष गुप्ता या मुलाला वैद्यकीय कारणामुळे आवश्यक महाविद्यालयीन तासिका भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे महाविद्यालयाने त्याला पाचव्या सत्र परीक्षेस परवानगी नाकारली. विद्यापीठाकडून या प्रकरणी मदत न मिळाल्याने, दक्षने उच्च न्यायालयात धाव घेतली. आवश्यक ती वैद्यकीय प्रमाणपत्रे दाखविल्यानंतर उच्च न्यायालयाने विद्यापीठाचा अंतिम निर्णय होईपर्यंत, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पाचव्या सत्राच्या परीक्षेला बसू द्यावे, असा निर्णय दिला. त्या परीक्षेत दक्ष पास झाला. नियमानुसार त्याने सहाव्या सत्राची परीक्षाही दिली, त्यातही तो पास झाला. मात्र, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार, त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला.

गेली पाच वर्षे निकाल मिळावा, म्हणून दक्ष गुप्ता विद्यापीठाच्या व कॉलेजच्या चकरा मारत आहे, पण निकाल द्यायला विद्यापीठ तयार नाही. हा प्रकार तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांना कळला, तेव्हा त्यांनी संताप व्यक्त करत, आपल्या विद्यापीठात माणुसकी, संवेदना आहेत की नाही, असा थेट सवाल कुलसचिवांना केला. विद्यार्थ्याचे आयुष्य असे पाच-पाच वर्षे वाया कसे घालविता, असेही त्यांनी विचारले. तेव्हा आम्ही तत्काळ प्रक्रिया पूर्ण करतो, असे कुलसचिवांनी त्यांना सांगितले. दक्षच्या अर्जावर स्वत: कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून लिहिलेला आदेश कायम आहे. मात्र, आपल्या आदेशाचे काय झाले, हे विचारायला कोश्यारी राज्यपाल पदावर नाहीत. विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

विद्यापीठाचे म्हणणे काय?
याबाबत कुलसचिव डॉ.सुनील भिरुड म्हणाले, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विद्यापीठाच्या सर्वोच्च समितीला या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, मॅनेजमेंट कौन्सिलकडून उपस्थितीची अट पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सांगत, निकाल राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. हे आपण त्या विद्यार्थ्याला कळविले का, असे विचारले असता, आम्ही महाविद्यालयाला कळविले, असे त्यांनी सांगितले.

न्यायालयात गेल्याची शिक्षा?
कागदोपत्री फिरवाफिरवी करण्यापेक्षा मुलाचा निकाल देणार का? नसेल देणार, तर त्याला तसे कधी कळविले? त्याची पाच वर्षे वाया गेली, ती कोण भरून देणार? दक्ष न्यायालयात गेला, म्हणून त्याच्या वाट्याला ही परवड आली आहे. 
दक्षसोबतची काही मुले उपस्थितीच्याच कारणावरून परीक्षेला बसू शकली नव्हती. ती न्यायालयातही गेली नव्हती. त्यांनी पुन्हा अर्ज केला आणि परीक्षाही दिल्या. ती मुले आता पास होऊन आपापल्या कामाला लागली आहेत. दक्ष न्यायालयात गेल्याची शिक्षा विद्यापीठाने त्याला अशा रीतीने दिली आहे.

Web Title: Such a record of the mumbai university: keeping the result for 5 years of one student on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.