Join us

प्रेमाचा असाही करुण अंत...; चोरलेल्या मोबाइलने उलगडले गूढ.; समलैंगिक संबंधालाही वाचा

By मनीषा म्हात्रे | Updated: March 20, 2025 13:19 IST

प्रेमाचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना समलैंगिक संबंधांवेळी ५५ वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडला. यातच त्याचा करुण अंत झाला; पण...

मनीषा म्हात्रे -मुंबई : मायानगरी मुंबापुरीत ५५ वर्षांच्या व्यक्तीची ३४ वर्षांच्या तरुणासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. प्रेमाचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना समलैंगिक संबंधांवेळी ५५ वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडला. यातच त्याचा करुण अंत झाला; पण ही गोष्ट एवढ्यावरच संपली नाही तर, पार्टनर सेक्समुळे बेशुद्ध पडल्याचे समजून घाबरलेल्या तरुणाने त्याला वैद्यकीय मदत न पुरवता धूम ठोकली. बाहेर पडण्यापूर्वी त्याने पार्टनरचे दोन्ही मोबाइलही सोबत घेतले. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिस तपासात या समलैंगिक संबंधांना वाचा फुटली. महिनाभराने चोरलेल्या मोबाइलने हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्यानंतर प्रेमाचा असाही अंत समोर आला. काळबादेवी परिसरात राहणारा मृत ५५ वर्षीय व्यक्ती अविवाहित होता. मालकीची दोन्ही घरं भाड्याने देत त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याचा उदरनिर्वाह व्हायचा. याच परिसरात कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या ३४ वर्षीय तरुणासोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. १२ वर्षांपासून एकमेकांच्या भेटीगाठी वाढल्या. तरुणाचे लग्न झाले असून त्याला मुलगा आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने दोघांनीही काळबादेवीतील घरात सेलिब्रेशन केले. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास दोघांमध्ये समलैंगिक संबंध सुरू असताना ५५ वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडला. त्याला कुठलीही वैद्यकीय मदत न करता जोडीदार पसार झाला. अखेर दोन दिवसाने त्याच इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांना त्यांचा दरवाजा उघडा दिसला. आतून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्याने त्यांनी आतमध्ये डोकावले तेव्हा ५५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच एलटी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.  

...म्हणून मोबाइल चोरला अन् फसला३४ वर्षीय तरुणाने त्याला मोबाईल ठेवायला दिला होता; मात्र तो त्याच्या पार्टनरकडून तो गहाळ झाल्याने दोघांमध्ये वाद झाले. पार्टनरने त्याला त्या बदल्यात पैसे देण्याचे कबूल केले; मात्र त्याला मोबाईल मिळाला नाही. घटनेच्या दिवशीही पार्टनरच्या अंगावर चादर टाकून त्याचे दोन मोबाईल घेऊन गेल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याच मोबाइलच्या आधारे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यामुळे हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका प्रियकराविरुद्ध ठेवण्यात आला.

यापूर्वीच्या घटना..२०१८  दोघेही इस्रायली नागरिक आहेत. याकोव आणि त्याची प्रेयसी इस्रायलवरून पर्यटक म्हणून मुंबईत आले होते. दोघेही कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये उतरले होते. सेक्स करताना याकोवकडून महिलेचा गळा दाबला गेला. त्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर वर्षभराने कुलाबा पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा नोंदवला.

२०२२ कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये आलेल्या एक ६१ वर्षीय वृद्धाचा प्रेयसीसोबत शाररिक संबंधादरम्यान मृत्यू झाला होता. कुर्ला पोलिसांनी एडीआर नाेंदवत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून तपास सुरू केला. त्या व्यक्तीने अमली पदार्थांचे सेवन केले होते.  

२०२४ ग्रँट रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये एका डायमंड कंपनीच्या व्यवस्थापकाने त्याच कंपनीत काम करणाऱ्या १४ वर्षीय तरुणीला फूस लावून मुंबईत आणले. या व्यक्तीने हॉटेलमध्ये राहण्यासाठी अल्पवयीन मुलीचे बनावट आधारकार्ड बनवले होते. सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस