मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्कॉर्पिओचे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. तसेच, पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे सीडीआरही विधानसभेत दाखवले. त्यानंतर, सचिन वाझेंना निलंबित करण्यात आले असून वाझे यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांविरुद्ध भाजपा आक्रमक झाली असून गृहंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही भाजपा नेते करत आहेत.
सचिन वाझे प्रकरणावरुन सोमवारी महाविकास आघाडीतील घडामोडींनाही वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी सायंकाळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेत भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर द्या, उगाच बॅकफूटवर जाण्याची गरज नाही, असा आदेश दिल्याचे समजते. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्फोटके व त्यानंतरच्या घटनाक्रमात कितीही मोठे अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते.
दुसरीकडे भाजपा नेते आक्रमक झाले असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट करण्यात आलंय. ''शिवसेनेचा आशिर्वाद असणाऱ्या सचिन वाझेने दहशतवादाचा कट रचला. त्या कारमध्ये १९ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. खुद्द एपीआयकडून एवढं मोठं षडयंत्र रचलं गेले असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांना कसलाच थांगपत्ता लागला नाही, हे नवलच! गृहमंत्री राजीनामा द्यायलाच हवा!'', असे ट्विट भाजपाने केले आहे. तसेच, सचिन वाझेवर कारवाईसाठी एनआयएला यावे लागते, मग आपल्या तपास यंत्रणा कुठे फोल ठरत आहेत? तुम्हीच त्यांना बळजबरीने कमकुवत करत आहात का? संपूर्ण राज्याची जबाबदारी असताना हे इतकं मोठं प्रकरण अनिल देशमुख यांच्याकडून हाताळलं गेलं नाही, तर त्या पदावर त्यांनी का राहावं?. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली. हा सगळा कट सचिन वाझे यांनी रचला हे ज्ञात असतानाही गृहमंत्री चिडीचूप का होते?, असे अनेक प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत.
गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील
सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांनीही कोणतीही चूक केली नाही, सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA करत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, जे कोणी चुकीचे वागले असतील तर त्यांना शिक्षा होईल असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. . (NCP state president Jayant Patil has Supported Home Minister Anil Deshmukh)