Join us

अशी आहे ध्वजनिर्मिती संहिता...

By admin | Published: August 09, 2015 11:09 PM

देशाची शान आणि मान असलेल्या राष्ट्र ध्वजाची संहिता तीन भागात तयार केली गेली. त्यातला पहिला भाग निर्मितीचा, दुसरा आरोहण अवरोहणाचा तर तिसरा हाताळणीचा असे भाग आहेत.

भाग्यश्री प्रधान, ठाणेदेशाची शान आणि मान असलेल्या राष्ट्र ध्वजाची संहिता तीन भागात तयार केली गेली. त्यातला पहिला भाग निर्मितीचा, दुसरा आरोहण अवरोहणाचा तर तिसरा हाताळणीचा असे भाग आहेत. त्यानुसार भारतात कापडी राष्ट्रध्वज तयार करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय खादी ग्रामोद्योगालाच आहे.१९५१ साली प्रथम ध्वजसंहिता तयार करण्यात आली. त्यानंतर, १९६८ आणि त्यानंतर २००८ साली याचे पुन्हा संशोधन करण्यात आले. संहितेनुसार ध्वज तयार करण्याचे काम फक्त खादी राष्ट्रीय ग्रामोद्योगाकडेच सोपविण्यात आले आहे. गांधीजींनी शहराकडे न जाता खेड्यांकडे चला, असा सल्ला जनतेला दिला आणि खेड्यांतील जनतेला रोजगार मिळावा, यासाठी चरख्याची निर्मिती केली. त्यानंतर, स्वातंत्र्यपूर्व १९३१ साली झेंड्याच्या वरील बाजूस केशरी, मध्ये पांढरा, सर्वात शेवटी हिरवा रंग आणि मधोमध चरख्याचे चिन्ह या पद्धतीने भारताचा तिरंगा तयार करण्यात आला. त्यानंतर, २३ जुलै १९४७ रोजी ध्वजसंहितेमध्ये बदल करून चरख्याच्या चिन्हाऐवजी २४ आरे असलेले अशोकचक्र वापरण्याचे ठरविले आणि त्याला सर्वत्र मान्यता मिळाली. मात्र, हा झेंडा चरख्यातून तयार होणाऱ्या खादी कापडापासूनच बनविण्यात येईल, असे ठरविण्यात आले. हे खादीचे कापड कापूस अथवा रेशीम धाग्यापासून बनविले जाते. त्यानुसार, देशभरात फक्त खादी राष्ट्रीय ग्रामोद्योग हाच कापडी राष्ट्रध्वज निर्माण करेल असे ठरविले गेले. त्यांच्या विक्रीची जबाबदारी याच संस्थेवर सोपविली गेली. बंगळुरू येथील बागलकोट येथे हे खादीचे कापड तयार केले जाते. त्यानंतर, त्याला केशरी, पांढरा, हिरवा असे रंग दिले जातात. त्यानंतर, कर्नाटक राज्यातील हुबळी येथे खादीचे राष्ट्रध्वज निर्धारीत मापातच शिवले जातात. ध्वज संहितेनुसार त्याचे १ ते ९ असे आकार असतात. पहिल्या क्रमांकाच्या झेंड्याचा आकार ६३०० मिलिमीटर लांबी आणि ४२०० मिलिमीटर रुंदी इतका असतो, तर त्यावरील अशोकचक्राचा आकार १२९५ मिलिमीटर इतका आहे. तर, नवव्या क्रमांकाचा झेंडा १५० मिलिमीटर लांबी व १०० मीटर रुंदी या आकाराचा असतो आणि त्यावर २५ मिलिमीटर इतक्या आकाराचे अशोकचक्र असते.बोरिवली येथील कोरा केंद्रात राष्ट्रध्वज बनविण्यासाठी देशभरातील ५० राष्ट्रीय खादी ग्रामोद्योग केंद्रांवरून आलेली खादीची वस्त्रे वापरली जातात, या केंद्रात ५ निष्णात कारागिर राष्ट्रध्वज शिवण्याचे काम करतात, अशी माहिती कोरा संस्थेतर्फे देण्यात आली.