असले ‘लूज’ बाॅल सीमारेषेबाहेर फटकवावे लागतील : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:53+5:302021-03-26T04:07:53+5:30
माझं ठरलंय : वेगवान बाॅलिंगही करणार आणि गुगलीही टाकणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मजाच येते. ...
माझं ठरलंय : वेगवान बाॅलिंगही करणार आणि गुगलीही टाकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मजाच येते. सध्या मला इतके लूज बाॅल मिळत आहेत की, त्यांना सीमारेषेबाहेर फेकावेच लागणार आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात फटकेबाजी सुरूच राहणार असल्याचा इशारा गुरुवारी दिला. लहानपणी बॅटिंग आणि बाॅलिंग आवडीने करायचो. फिल्डिंग क्वचितच करायचो, पण जेव्हा करायचो तेव्हा माझी ‘कॅच’ कधीच सुटली नाही, असे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.
दादर पूर्वेतील पुरंदरे मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वडाळा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. औपचारिक उद्घाटनानंतर मैदानावर काही चेंडू खेळत फडणवीस यांनी खेळाच्या मैदानावरील आपली फटकेबाजीही दाखवून दिली. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फटके लगावल्यानंतर त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली.
क्रिकेट खेळायला नेहमीच आवडते. बॅटिंग करायला आवडत असले तरी गोलंदाजीसुद्धा आवडते, पण मी बाॅडीलाईन बाॅल टाकत नाही. गोलंदाजी करताना विचारपूर्वक स्टम्पवरच बाॅल टाकत असतो. संधी मिळेल तेव्हा वेगवान गोलंदाजी करणार आणि गुगलीही टाकणार, पण मी कधी शाॅर्ट पिच बाॅल टाकणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी क्रिकेटच्या भाषेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.
फोन टॅपिंगप्रकरणात महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांना लक्ष्य केले आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, ज्यांनी चोरी केली त्यांची चौकशी करायची की चोरी करणाऱ्यांची. ज्यांनी चोरी केली त्यांना मोकाट सोडून ज्यांनी ही प्रकरणे उघडकीस आणली त्यांच्या मागे सरकार लागले आहे. खंडणी वसुलीची, बदल्यांच्या रॅकेटवर कारवाई करायची नाही. त्यापेक्षा हे सारे शोधून काढणाऱ्यांची चौकशी करायचा सरकारचा प्रयत्न आहे. यातूनच या सरकारची मानसिकता लक्षात येते, असेही त्यांनी सांगितले.
.....................