Join us

संगीत रंगभूमीवरील शिवशंभोची अशीही एक आठवण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी रंगभूमीवर विविध प्रकारची नाटके सादर होत असतात. यात सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ऐतिहासिक यांच्यासह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी रंगभूमीवर विविध प्रकारची नाटके सादर होत असतात. यात सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ऐतिहासिक यांच्यासह आध्यात्मिक व पौराणिक नाटकांचाही मोठा वाटा आहे. विशेषतः संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात एकाहून एक सरस अशी पौराणिक नाटके रंगमंचावर आली आणि लोकप्रिय ठरली. यातलेच एक महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘जय जय गौरीशंकर !’ या नाटकात शिवशंकराची भूमिका साकारणारे गायक-नट संगीतभूषण पं. राम मराठे यांची आठवण महाशिवरात्रीच्या निमित्ताने दृगोच्चर झाली आहे.

पं. राम मराठे यांचे सुपुत्र मुकुंद मराठे यांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून, पं. राम मराठे यांचे शिवशंभोच्या अवतारातील दुर्मीळ छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसिद्ध करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शास्त्रीय गायक व संगीत रंगभूमीवरील गायक-नट पं. राम मराठे यांनी ‘जय जय गौरीशंकर’ या नाटकात शिवशंकराची भूमिका रंगवली आणि साक्षात शिवशंभोचे साकार झालेले रूप रसिकांना त्यांच्यात अनुभवायला मिळाले. नाटककार विद्याधर गोखले लिखित आणि नटवर्य मामा पेंडसे दिग्दर्शित या नाटकाची मूळ निर्मिती ‘ललितकलादर्श’चे अध्वर्यू भालचंद्र पेंढारकर यांनी केली होती.

या नाटकात शिवशंकर, अर्थात मंगेशीच्या रूपात पं. राम मराठे यांनी भूमिका साकारली.

सन १९६६ पासून प्रत्येक महाशिवरात्रीला व श्रावणी सोमवारी, असे एकाच दिवशी या नाटकाचे दोन किंवा तीन प्रयोग व्हायचे. पं. राम मराठे यांनी नटवर्य भालचंद्र पेंढारकर आणि संगीतरत्न प्रसाद सावकार यांच्यासमवेत या नाटकाचे तब्बल अडीच हजार प्रयोग केले होते. या नाटकाच्या व्यतिरिक्तही पं. राम मराठे यांनी इतर अनेक जुन्या व नवीन अशा २२ संगीत नाटकांचे सुमारे साडेसात हजार प्रयोग केले. तसेच, साधारण तीन हजार मैफिलीही त्यांनी रंगवल्या. त्यांची मैफल रात्री साडेनऊ वाजता सुरू होऊन पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असायची, अशी एक आठवणही पं. राम मराठे यांच्याबाबतीत आवर्जून सांगितली जाते.

फोटो कॅप्शन : शिवशंकराच्या भूमिकेतील पं. राम मराठे यांचे छायाचित्र.